ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

ठाणे : मोबाइलचे नेटवर्क गायब करून मोबाइलधारकाच्या बँक खात्यातून पैसे काढणारी एक टोळी कार्यरत असून या टोळीतील जगदीश कावरिया (३२) याला बुधवारी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून मुंबई आणि हैदराबादमधील दोन गुन्हे उघडकीस आणले असून यात २३ लाख रुपयांचा गंडा घातल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दिवा येथील श्रीकृष्ण पार्क भागात एक जण गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या पथकाने सापळा रचून एकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याजवळून गावठी कट्टा जप्त केला. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता तो बँक खाते हॅक करून पैसे लुटणाऱ्या टोळीत कार्यरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्याकडून मुंबई व हैदराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आणले. त्यात दोन ग्राहकांना २३ लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी त्याला हैदराबाद किंवा मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

कार्यपद्धती कशी?

कर्ज किंवा नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकाकडून आधार कार्ड, धनादेश किंवा पॅनकार्डची प्रत घेतली जाते. याच प्रती कर्ज देणाऱ्या व्यक्तीकडून ही टोळी खरेदी करते. ही टोळी तंत्रज्ञानाच्या मदतीने मोबाइल नेटवर्क गायब करते. शनिवारी आणि रविवारी बँक आणि मोबाइल गॅलऱ्या बंद असतात. मोबाइलधारकाने बँक खाते तपासू नये म्हणून ही टोळी हे काम फक्त शुक्रवारी करत असे. त्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकाच्या आधारे बँक खात्यातील पैसे जगदीशच्या खात्यावर वळते केले जात. संबंधित व्यक्तीच्या मोबाइलचे नेटवर्क नसल्याने त्याला पैसे वळते झाल्याचे समजत नसे.

नागरिकांनी मोबाइलचे नेटवर्क गेल्यास झाल्यास तात्काळ दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून कंपन्यांच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा. मोबाइल नेटवर्क का गेले झाले आहे, याची माहिती जाणून घ्यावी, अन्यथा मोठा गंडा घातला जाऊ शकतो.

– अनिल होनराव – वरिष्ठ पोलीस निरीक्षक