तीन दुचाकीचोर टोळय़ा ठाणे पोलिसांकडून जेरबंद

कर्जाचे हप्ते थकवणाऱ्या ग्राहकांकडून जप्त केलेल्या दुचाकी बँकेने विक्रीसाठी काढल्याची बतावणी करत चोरलेल्या दुचाकींची विक्री करणाऱ्या तीन टोळय़ांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केले आहे. दुचाकी चोरून त्यामध्ये जुजबी बदल करून सर्वसामान्य ग्राहकांना विकण्यात ही टोळी पटाईत होती. विशेष म्हणजे, यासाठी त्यांनी वेगवेगळे दलालही नेमले होते. या तिन्ही टोळय़ांकडून मिळून ५१ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दुचाकी चोरींच्या गुन्ह्य़ात वाढ होऊ लागली असून या पाश्र्वभूमीवर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेची विविध पथके दुचाकी चोरीच्या गुन्ह्य़ात सक्रिय असलेल्या टोळ्यांचा माग काढीत होती. या तपासादरम्यान ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने तीन वेगवेगळ्या टोळ्यांच्या म्होरक्यांना अटक केली आहे. संदेश दत्ताराम मालाडकर (३१, रायगड), बाबू परमेश्वर शेट्टीयार (२८, रा. कळवा) आणि विनोद गणेश बनकरी (२६, रा. शहापूर) अशी टोळीच्या म्होरक्यांची नावे असून गेल्या काही वर्षांपासून हे तिघे दुचाकी चोरी आणि विक्रीचा उद्योग करीत आहेत. या तिन्ही टोळीतील साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.

या टोळ्यांनी दुचाकींच्या विक्रीसाठी दलाल नेमले होते आणि त्यांच्यामार्फत विक्रीचा सौदा केला जात होता. ठरलेल्या व्यवहारापैकी साठ ते सत्तर टक्के रक्कम संबंधित ग्राहकांकडून आधीच घ्यायची आणि उर्वरित रक्कम बँकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कागदपत्रे दिल्यानंतर देण्यास सांगायची, अशी या टोळीची कार्यपद्धती होती.

५१ दुचाकी जप्त..

मुंबई, ठाणे शहर व ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड भागातून या तिन्ही टोळ्यांनी ३२ दुचाकी चोरून त्यांची विक्री केली होती. या सर्व दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय, आणखी १९ दुचाकी सापडल्या असून त्या कोठून चोरण्यात आल्या आहेत, याचा शोध सुरू आहे.

टोळीची कार्यपद्घती..

चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी नेमलेल्या दलालमार्फत ग्राहक शोधले जायचे. ठरलेल्या व्यवहारापैकी साठ टक्के रक्कम टोळी आधीच घ्यायची आणि उर्वरित रक्कम कागदपत्रे दिल्यानंतर देण्यास सांगायची. मात्र, दुचाकी देऊन आगाऊ पैसे घेऊन टोळी पसार व्हायची.