News Flash

ठाण्यात गुंतवणूक योजनेतून ग्राहकांची फसवणूक

शंभर ते दीडशे जणांना ७२ लाखांचा फटका; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

(संग्रहित छायाचित्र)

शंभर ते दीडशे जणांना ७२ लाखांचा फटका; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ठाणे : दरमहा पाचशे रुपयांपासून पुढे गुंतवणूक करा आणि पंधरा महिन्यांनंतर जास्त पैसे किंवा सोन्याचे दागिने मिळवा, अशा फसव्या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना गंडा घालणाऱ्या सराफाला नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संतोष शेलार असे ताब्यात घेतलेल्या सराफाचे नाव असून तो घोडबंदर येथील पातलीपाडा भागात राहतो. त्याने आतापर्यंत ठाणे, कळवा, विटावा आणि मुंब्रा या भागातील तब्बल शंभर ते दीडशे नागरिकांची ७२ लाखांची फसवणूक झाली असून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. फसवणूक झालेल्यांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

शेलार याने नौपाडय़ातील विष्णूनगर भागात त्रिमूर्तीरत्न ज्वेलर्स नावाने दुकान थाटले होते. या दुकानाच्या माध्यमातून त्याने एक योजना सुरू केली होती. दरमहा पाचशे रुपयांपासून पुढे गुंतवणूक करा आणि पंधरा महिन्यांनंतर जास्त पैसे किंवा सोन्याचे दागिने मिळवा अशा स्वरूपाची ही योजना होती. या योजनेकरिता त्याने दलाल नियुक्त केले होते. या दलालांमार्फत अनेक जण योजनेमध्ये पैसे गुंतवत होते आणि या दलालांमार्फत शेलार गुंतवणूकदारांचे पैसे गोळा करीत होता.

२०१६ मध्ये ही योजना सुरू झाली. पहिल्या मुदतीनंतर गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे पैसे मिळाले. त्यामुळे या योजनेची विश्वासार्हता वाढल्याने गुंतवणूकदारांचा आकडा वाढला. परंतु दुसऱ्या मुदतीनंतर गुंतवणूकदारांना पैसे मिळाले नाहीत. तसेच शेलार याने दुकान बंद केले आणि मोबाइलही बंद केला. याबाबत दलालांकडूनही काहीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्याआधारे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून शेलार याला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली.

शेलारने ठाणे, कळवा, विटावा आणि मुंब्रा या भागातील तब्बल शंभर ते दीडशे नागरिकांना ७२ लाखांचा गंडा घातला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 3:17 am

Web Title: thane police arrested jewellery for cheating customers
Next Stories
1 वसईतील वीज समस्यांवर ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात आज चर्चा
2 सायकल ठेकेदारावर ‘कृपा’
3 वालधुनी नदीवर नवा पूल
Just Now!
X