नाव :- अब्दुल सिकदर / मोटू शोपान मंडल
नागरिकत्व :- बांग्लादेशी / भारतीय
कामधंदा :- भारतीय चलनातील बनावट नोटा चलनात आणणे.
ठाणे स्थानक परिसरातील दोन महिन्यांपुर्वीचा प्रसंग. स्थानक परिसरात विविध खाद्य पदार्थ विक्रीच्या हातगाडय़ा लागतात. त्यापैकी एका हातगाडीवर अब्दुलने पावभाजी खाल्ली आणि विक्रेत्याच्या हातावर एक हजारांची बनावट नोट टेकवली. विक्रेत्याने नोटेकडे बारकाईने पाहून त्याला उर्वरित पैसे दिले. रात्री हातगाडी बंद केल्यानंतर विक्रेत्याने दिवसभराचा हिशोब केला. त्याने व्यवसायाच्या नफ्याची रक्कम बाजूला काढून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो नफ्याची रक्कम बँकेत भरण्यासाठी गेला. तिथे बँकेच्या अधिकाऱ्यांकडे त्याने पैसे जमा केले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी नोटांची तपासणी केली असता त्यामध्ये एक हजारांची नोट बनावट असल्याचे निष्पन्न झाली. यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी ही नोट स्विकारली नाही. बनावट नोटमुळे आर्थिक नुकसान झाल्यामुळे तो काहीसा नाराज झाला. त्यानंतर तो हातगाडीवर परतला आणि नेहमीप्रमाणे खाद्य पदार्थ विक्रीचे काम करू लागला. एकीकडे ग्राहकांना खाद्य पदार्थ देण्याचे काम सुरू असतानाच दुसरीकडे मात्र तो बनावट नोटचा विचार करीत होता. ही नोट कुणी दिली असावी, याचा तो अंदाज बांधत होता. त्याचवेळी अब्दुल पुन्हा त्याच्या हातगाडीवर पावभाजी खाण्यासाठी आला. त्याने पावभाजी खाऊन पुन्हा एक हजारांची नोट दिली. यामुळे बनावट नोट देणारा हाच तो ग्राहक असावा तसेच आता दिलेली नोटही बनावट असावी, असा अंदाज विक्रेत्याने बांधला. या भामटय़ाला पोलिसांच्या हवाले करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली आणि नोट सुट्टे करण्याच्या बाहण्याने विक्रेत्याने त्याला थांबवून ठेवले. त्याचदरम्यान त्याने ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकातील ओळखीच्या एका पोलिस कर्मचाऱ्याला माहिती दिली. त्यानंतर काही क्षणातच ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने घटनास्थळी धाव घेऊन अब्दुलला ताब्यात घेतले. तसेच पथकाने त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक हजारांच्या २२ नोटा सापडल्या. त्याचवेळी त्याच्या बनावट नोटांच्या उद्योगाचे बिंग फुटले. याप्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि अब्दुल याला अटक करण्यात आली.
ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंग, तत्कालीन सह पोलिस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहाय्यक पोलिस आयुक्त नागेश लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांच्या पथकाने याप्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला. या पथकातील पोलिस उपनिरीक्षक मनोहर घाडगे, पोलीस कॉन्सटेबल उत्तम भोसले, पोलीस नाईक काळुराम शिरोसे यांनी अब्दुलची कसून चौकशी केली. त्याआधारे पथकाने त्याचे साथीदार मोहमंद सोबूज मोटूर खान (३०) आणि नजमुल हसन अहाद अली शेख (२०) या दोघांना अटक केली. त्यानंतर पथकाने तिघांच्या घराची झडती घेतली असता, त्यांच्या घरामध्ये चार लाख रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. मुंब्रा परिसरात अब्दुलने भाडय़ाने घर घेतले होते. या घरामध्ये झडतीदरम्यान पथकाला बनावट नोटांसोबतच काही महत्वाची कागदपत्रे मिळाली. त्यामध्ये अब्दुलच्या नावाचे पारपत्र तर मोटू शोपान मंडल या नावाचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड सापडले. यामुळे पथकही चक्रावले आणि त्यांनी अब्दुलकडे कागदपत्रांची चौकशी केली. त्यावेळी त्याने ही दोन्ही नावे त्याचीच असल्याचे सांगितले. यापैकी अब्दुल हे त्याचे खरे नाव आणि तो मुळचा बांग्लादेशी आहे. या नावाचे त्याच्याकडे अधिकृत पारपत्र असून त्या आधारेच तो मुंबईत यायचा. या प्रवासादरम्यान तो सात ते आठ लाखांच्या बनावट नोटा लपवुन आणायचा आणि त्या मुंबई, ठाणे परिसरातील दुकानांमध्ये वटवायचा. महिनाभरात या सर्व नोटा वटविल्यानंतर तो पुन्हा बांग्लादेशमध्ये परतायचा. आतापर्यंत तो सात वेळा मुंबईत येऊन गेल्याचे तपासात उघड झाले आहे. बांग्लादेशचा अधिकृत पारपत्र असले तरी, भारतामध्ये काही अडचण उद्भवू नये म्हणून त्याने भारतीय नागरिकत्वासाठी रितसर आधारकार्ड व पॅनकार्ड बनवून घेतले होते. त्यासाठी त्याने रेशनिंग कार्डाच्या झेरॉक्स कॉपी दिल्या होत्या, त्या सुद्धा बनावट असल्याचे तपासात पुढे आले आहे. एका दुकानदाराला गंडा घालण्याचा त्याचा बेत फसला. गेल्या दोन महिन्यांपासून अब्दुल आणि त्याचे दोघे साथीदार तुरूंगाची हवा खात आहेत.

 

नीलेश पानमंद