१०५ गुन्हे उघड; ८० वाहने जप्त

ठाणे : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे व गुजरातमधून राज्यातून मालवाहू वाहने चोरून त्यांची विक्री करणाऱ्या नऊ जणांच्या टोळीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने १७० वाहने चोरल्याचे समोर आले असून १०५ गुन्हे उघडकीस आले आहेत. तीन कोटी ४० लाख रुपये किमतीची ८० वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. या वाहनांची नागालँडमधील प्रादेशिक परिवहन विभागात नोंदणी करण्यात आल्यामुळे या विभागाचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

देशातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. संदीप मुरलीधर लागू (५५), सादिक मेहबूब खान मुल्ला, अल्ताब अब्दुलगणी गोकाक, विनीत रतन माधीवाल, मांगीलाल शुभनाराम जाखड, रामप्रसाद गणपतराम ईनानिया, जावेद ऊर्फ बबलू मुख्तार खान, अल्ताब एकबाल कुरेशी आणि मोहम्मद युसूफ नईम खान अशी अटक करण्यात आलेल्या नऊ जणांची नावे आहेत. ठाण्यातील वृंदावन सोसायटी परिसरात राहणारे उद्धव नाना साठे यांचे मालवाहू पिकअप वाहन चोरीला गेले होते. १० डिसेंबर २०१८ रोजी ही चोरी झाली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी दिली. या गुन्ह्य़ाचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव यांच्याकडे देण्यात आला होता. वाहने पुण्यातील गोदामात ठेवण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त सत्यनारायण, पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी पाच पथके तयार केली. त्यात सहायक पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, प्रदीप सरफरे, विश्वास जाधव, नीलेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा बाबर, संतोष तागड, गणेश केकाण आणि महेश जाधव यांचा समावेश होता. या पथकाने वाहन चोरणारे, वाहन खरेदी करणारे, इंजिन व चेसीज क्रमांकात फेरफार करून नागालँड येथे वाहन नोंदणी करणारे कर्नाटक व राजस्थानातील वाहन विक्री दलाल, या सर्वाना अटक केली, अशी माहिती सहपोलिस आयुक्त पाण्डेय यांनी दिली.

जीपीएस यंत्रणेमुळे टोळीला अटक..

राबोडीच्या गुन्ह्य़ातील वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली होती. या वाहनाची चोरी केल्यानंतर आरोपींनी ते पुण्यातील एका गोदामात उभे केले होते. जीपीएस यंत्रणेमुळे या वाहनाचा शोध लागला आणि त्यानंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले. संदीप याने पुण्यात गोदाम भाडय़ाने घेतले होते. बँकेने जप्त केलेली वाहने गोदामात ठेवत असल्याची माहिती त्याने गोदाम मालकाला दिली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विविध शहरांतून चोरलेली वाहने

ठाणे शहर ३२, पालघर १२, पुणे शहर ४, पिंपरी चिंचवड ३, पुणे ग्रामीण ६, रायगड ८, नाशिक शहर १, नवी मुंबई १४, ठाणे ग्रामीण ६, मुंबई शहर १४, अहमदनगर १ आणि गुजरात ४ असे एकूण १०५ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यापैकी ८० वाहने जप्त करण्यात आली असून त्यामध्ये ६९ महिंद्रा पिकअप, ८ महिंद्रा बोलेरो, १ होंडा सिटी, १ वेर्णा, १ ब्रिझा या वाहनांचा समावेश आहे.