गुडविन ज्वेलर्सच्या मालकांची ठाण्यातली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी सुनील अकराकरण, सुधीरकुमार अकराकरण यांनी गुडविन ज्वेलर्सच्या शाखा उघडल्या होत्या. या ज्वेलर्सच्या माध्यमांतून त्यांनी विविध योजनाही सुरु केल्या होत्या. एक वर्षाच्या ठेवीवर १६ टक्के व्याज, दोन वर्षांच्या ठेवींवर १८ टक्के व्याज आणि पाच वर्षात दामदुप्पट अशा या योजना होत्या. ज्यामध्ये अनेक ग्राहकांनी पैसे भरले. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गुडविन ज्वेलर्सच्या सगळ्या शाखा बंद झाल्या. त्यामुळे गुंतवणूकदारांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दोन्ही मालक दुकानं बंद करुन फरार झाल्याचं ग्राहकांना समजलं.

गुडविन ज्वेलर्सच्या माध्यमातून या दोघांनी ग्राहकांची फसवणूक केली. दरम्यान आपल्याला ५० कोटी रुपये खंडणीची मागणी झाली आहे असं या दुकानाच्या मालकांनी सांगितलं. तसंच ग्राहकांचे पैसे परत देऊ असंही त्यांचं स्पष्टीकरण समोर आलं होतं. मात्र अद्याप याबाबत कोणीही समोर आलेलं नाही. दरम्यान गुडविन ज्वेलर्सची फसवणूक ही पूर्वनियोजित असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. भिशी आणि ज्यादा व्याजदराचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक गुडविन ज्वेलर्सच्या दोन मालकांनी केली. आता याप्रकरणी त्यांची ठाण्यातली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.