प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयांतून (आरटीओ) दलालांना हुसकावून लावण्यासाठी परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी सुरू केलेल्या मोहिमेचा परिणाम आता ठाण्यातील आरटीओतही दिसून येत आहे. परिवहन विभागाच्या दोन्ही कार्यालयांत दलालांना प्रवेश मिळू नये यासाठी कार्यालय प्रवेशाकरिता सक्तीने ओळखपत्र तपासण्यात येत असून दोन्ही कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक व पोलीस तैनात करण्यात आले आहेत.  
कार्यालयात ‘अभ्यांगत मदत कक्ष’ सुरू करण्यात आला असून या कक्षामार्फत अनेक नागरिकांना कार्यालयातील कामकाजाचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. दलाल नाहीत तर नागरिकांची कामे कशी होणार, अशी ओरड एकीकडे सुरु असताना या अभ्यांगत कक्षात परवाने मिळविण्यासाठी अर्ज कसे भरावेत, त्यासाठी किती शुल्क आकारले जाणार याची सविस्तर माहिती देण्यात येत असून दलाल मुक्तीच्या दिशेने हे एक नवे पाउल असल्याचा दावा येथील वरिष्ठ अधिकारी करत आहेत.
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय एरवी दलालांनी गजबजलेले असायचे. मध्यंतरी परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दलाल मुक्तीचा प्रयत्न करुन पाहीला. मात्र, नागरिकांचा ओढा दलालांच्या दिशेने असल्याने या प्रयत्नांना फारसे यश मिळाले नाही. परंतु, परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या एका आदेशामुळे कार्यालयातील दलाल हद्दपार झाले आहेत. या आदेशानुसार दलाल कार्यालय परिसरात आढळला तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या पाश्र्वभूमीवर दलालांनी कार्यालयात प्रवेश करू नये, यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. दलालांमार्फत येणारी कामे स्विकारली जाणार नाही, असा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्यासंबंधीचे फलक कार्यालयात लावले आहेत. या आदेशानंतरही दलाल कार्यालयात सहजपणे येऊन त्यांची कामे करू शकतात, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे दलालांना प्रवेशद्वारावर रोखण्यासाठी प्रशासनाने व्युहरचना आखली आहे. दोन्ही कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर पोलीस आणि सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून त्यांच्यामार्फत कार्यालयात येणाऱ्या व्यक्तींचे ओळखपत्र तपासले जात आहे. दलाल नसल्याची खातरजमा झाल्यानंतरच त्या व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जात आहे.

कर्मचाऱ्यांच्या ‘ओव्हर टाइम’ला आळा
कार्यालयीन कामकाजाशिवाय अन्य वेळेत दलाल त्यांची कामे कर्मचाऱ्यांमार्फत करू शकतात, अशी भीती प्रशासनाला आहे. यामुळे सकाळी ठरलेल्या वेळेत कार्यालय उघडण्यात येईल तसेच सायंकाळी वेळेत कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही कार्यालये सकाळी १० ते ६ या वेळेतच खुली ठेवली जात आहेत. तसेच रात्री उशीरापर्यंत कुणीही कार्यालयात थांबू नये, असे आदेश जारी केले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.