ठाणे पोलिसांचा उमेदवारांना दिलासा
राज्यभरातील विविध जिल्ह्य़ांत सुरू असलेली पोलीस भरतीप्रक्रिया सध्या ठाण्यातील साकेत येथील पोलीस मैदानात सुरू आहे. तापमानाचा चढता पारा आणि कडाक्याचे ऊन यांमुळे शारीरिक चाचण्या देणे उमेदवारांना कठीण जात आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी ही भरती प्रक्रिया सकाळी ७ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ७ या वेळेत राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील विविध जिल्ह्य़ांमध्ये पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना शारीरिक तसेच लेखी चाचण्या द्याव्या लागतात. या सर्व चाचण्या खुल्या मैदानामध्ये घेण्यात येतात. त्यामध्ये ठरावीक अंतरापर्यंत धावणे तसेच अन्य शारीरिक चाचण्यांचा समावेश असतो. रणरणत्या उन्हामध्ये मैदानात धावताना उमेदवारांना त्रास होण्याची शक्यता अधिक असते, तसेच अशा चाचण्यादरम्यान मुंबईमध्ये दोन वर्षांपूर्वी चार उमेदवारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी भरती प्रक्रियेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन भरती प्रक्रिया सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात घेण्यात येत आहे. सकाळी ७ ते १२ आणि दुपारी ४ ते ७ या वेळेत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून दुपारच्या वेळेत मात्र उमेदवारांना विश्रांती देण्यात येणार आहे.
ठाणे पोलीस दलातील २३० जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पोलीस शिपाई पदाकरिता असलेल्या भरतीसाठी सुमारे ४२ हजार अर्ज आले आहेत. गेल्या २९ मार्चपासून साकेत येथील पोलीस मैदानात ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

लाच न देण्याचे आवाहन
ठाणे पोलीस दलातील भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी तसेच या भरती प्रक्रियेसाठी लाचखोरी होऊ नये, यासाठी ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अशा लाचखोरांची माहिती थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासाठी क्रमांक जाहीर केले आहेत.
’ ठाणे पोलीस आयुक्त- २५३४४४९९
’ ठाणे सहपोलीस आयुक्त- २५३४२१६३
’ ठाणे अपर पोलीस आयुक्त- २५३८२५६६

रणरणत्या उन्हामध्ये मैदानी चाचण्या देताना एखाद्या उमेदवाराला आपला प्राण गमावावा लागू नये, यासाठी ठाणे पोलिसांनी यंदाच्या पोलीस भरतीच्या वेळेत अशा स्वरूपाचे बदल केले आहेत.
– आशुतोष डुम्बरे, सहपोलीस आयुक्त, ठाणे