ठाण्यात येणाऱ्या नागरिकांकडून अर्ज भरून घेण्याची पद्धत सुरू

ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरातील कोणत्याही पोलीस ठाण्यात नागरिक तक्रार किंवा अन्य काही कारणासाठी गेले तर तेथे त्यांना पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांकडून तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कशी वागणूक मिळाली यासंबंधी अनुभव कथन करणारा अर्ज भरून देण्याची पद्धत पोलीस आयुक्तालयामार्फत सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून योग्य सहकार्य मिळाले का, तसेच पोलीस सेवेविषयी तुमचे मत काय, अशी माहिती या अर्जात भरून देण्याची मुभा नागरिकांना देण्यात आली आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यामधील दुरावा दूर करणे तसेच त्यांच्यात सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे, या उद्देशातून हा अर्ज भरून घेण्यात येत आहे असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास नागरिक तयार नसतात. पोलीस ठाण्यात गेले की न्याय मिळण्याची शक्यता दूरच, असे आजही अनेकांना वाटते. उलट हजारो प्रश्नांनी बेजार होण्याची भीती असते. वरिष्ठ पोलीस अधिकारी तर चढय़ा आवाजात बोलतात, असा अनेकांचा अनुभव. ही परिस्थिती बदलावी यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाने पुढाकार घेतला आहे. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्यांशी सौहार्दाने वागावे असे धडे पोलीस कर्मचाऱ्यांना अनेक वेळा दिले जातात. त्यानंतरही पोलीस फारसे सहकार्य करत नाहीत अशा तक्रारी नागरिकांच्या असतात. यावर उपाय म्हणून पोलीस ठाण्यात पाउल ठेवल्यानंतर तेथील अनुभव कसा होता याची माहिती आता तक्रारदार किंवा इतर कामांसाठी येणाऱ्या नागरिकांकडून भरून घेतली जाणार आहे.

सौहार्द वाढविण्यासाठी क्लृप्ती

पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांशी कसे वर्तन करावे. नागरिकांशी कसे बोलावे. त्यांच्या सूचना, तक्रारींची कशी दखल घ्यावी. त्याचे निराकरण कसे करावे आणि समाधानाने तक्रारदाराला कसे घरी पाठवावे, या विषयी वेळोवेळी पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या या प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष किती उपयोग होतो हे जाणून घेण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाने आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यांना नागरिकांकडून पोलीस ठाण्याविषयी प्रतिक्रिया जाणून घेणारा (फिड बॅक) नमुन्यातील अर्ज भरून घेण्यात येत आहे. या अर्जात कोणत्या कारणासाठी पोलीस ठाण्यात आले आहात तसेच पोलीस ठाण्यात आल्यानंतर स्वागत कक्ष सुरू होता का यासंबंधीची माहिती भरून द्यावी लागणार आहे. तसेच उपस्थित कर्मचाऱ्याने तुम्हाला बसण्याची विनंती केली का, तुमच्या कामाबद्दल संबंधित अधिकारी व्यक्तीशी तुम्हाला भेटून दिले का तसेच पोलिसांचे वर्तन सोहार्दाचे, तटस्थ, अनुत्साही, अरेरावीचे होत किंवा कसे यासंबंधीची माहितीही या अर्जात भरून द्यावयाची आहे. पोलीस ठाण्यातील पोलीस सेवेविषयी नागरिकांनी पोलिसांना १ ते १० पर्यंत गुण द्यायचे आहेत. हा सगळा अहवाल नागरिकांनी भरून दिलेल्या अर्जासह ठाणे पोलीस आयुक्तालयापर्यंत पोहच केला जातो, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. या प्रक्रियेमुळे नागरिकांशी अरेरावीने बोलण्याचा काही मंडळींचा स्वभाव होता, त्यास आळा बसला आहे, असा दावाही या अधिकाऱ्याने केला.

नागरिकांमधील पोलिसांविषयीची भीती दूर करावी. पोलीस ठाण्यात ओळखीची व्यक्ती घेऊन गेल्याशिवाय काम होत नाही, हा नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर व्हावा. पोलीस आणि नागरिक यांच्यात सौहार्दपूर्ण, जिव्हाळ्याचे नाते निर्माण व्हावे तसेच पोलीस ठाण्यात कोणतेही काम घेऊन आलेल्या नागरिकाला चांगली वागणूक मिळावी हा या प्रक्रियेमागील उद्देश आहे. आलेली व्यक्ती समाधानाने पोलीस ठाण्यातून बाहेर पडली पाहिजे, हा अर्ज भरून घेण्यामागील उद्देश आहे. अदखलपात्र गुन्हा दाखल असेल तर संबंधिताला नियंत्रण कक्षातून तक्रारीचे निराकरण झाले की नाही याची विचारणा केली जाते. भरून घेतलेल्या अर्जाची आम्ही तपासतो. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी तत्परतेने काम करतो.

-रवींद्र वाडेकर, साहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली