आठवडय़ाची मुलाखत : परमबीर सिंग (पोलीस आयुक्त, ठाणे)

पेट्रोल चोरी करून ग्राहकांची लुटमार करणाऱ्या राज्यातील विविध पंपांचा भांडाफोड करत ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पेट्रोल चोरीमध्ये कार्यरत असलेली साखळी उघड केली आहे. या चोरीप्रकरणी मुख्य सूत्रधार प्रकाश नुलकर याच्यासह २३ जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. या गोरखधंद्याचा उलगडा, मुख्य सूत्रधाराचा माग आणि पेट्रोल चोरीमागचे अर्थकारण कसे होते, याविषयी ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी केलेली बातचीत..

* पंपावरील पेट्रोल चोरी उघड कशी झाली?

डोंबिवली शहरात राहणाऱ्या विवेक शेटय़े याने उत्तर प्रदेशमधील पंप मालकांना पेट्रोल चोरीसाठी मायक्रोचिप पुरविली होती. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी आणि आमच्या पथकाने त्याला काही महिन्यांपूर्वी डोंबिवलीतून अटक केली होती. त्याला अटक केल्यानंतर महाराष्ट्रातील विविध शहरांमधील पंपांवर अशा प्रकारे पेट्रोल चोरी होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. तसेच या पंपांवर धाडी टाकण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी परवानगी दिली आणि त्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संबंधित पंपांवर धाडी टाकून तिथे होणारी पेट्रोल चोरी उघड केली.

* पेट्रोल चोरी कशा प्रकारे केली जात होती?

पेट्रोल यंत्रातील पल्सर किटमध्ये, कंट्रोल पॅनलमध्ये फेरफार केलेली चिप बसविणे, कंट्रोल पॅनलच्या पोर्टला बीफो वायरच्या साहाय्याने लॅपटॉप जोडून त्यामध्ये बनावट प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर लोड करणे आणि पेट्रोल यंत्रातील चिपला रिमोट जोडून त्याद्वारे पेट्रोल चोरी करणे या चार पद्धतीद्वारे पेट्रोल चोरी करण्यात येत असल्याचे कारवाईतून समोर आले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून पेट्रोल चोरी केली जात होती. तसेच फेरफार केलेल्या चिपचा पुरवठा करणारे, पेट्रोल यंत्र तयार करणाऱ्या कंपन्यांचे तंत्रज्ञ, पंपमालक आणि व्यवस्थापक अशी पेट्रोल चोरांची साखळीही उघड करण्यात यश आले असून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रकाश नुलकर यालाही अटक करण्यात आली आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होणारी ही चोरी पकडणे फारच कठीण होते.

*  पोलीस सूत्रधारांपर्यंत कसे पोहोचले?

राज्यातील विविध पंपांवर पेट्रोल चोरी होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्याआधारे संबंधित पंपांवर नेमकी कशा प्रकारे पेट्रोल चोरी केली जाते, याचा आढावा खबऱ्यांमार्फत घेत होतो. त्या वेळेस अनेक पंपांवर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांसाठी विशेष प्रशिक्षणवर्ग घेऊन त्यामध्ये त्यांना विविध तज्ज्ञांमार्फत पंपावरील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती दिली. त्यामुळेच राज्यातील एकूण ९६ धाडींमध्ये ५६ ठिकाणी पेट्रोल चोरी उघड करण्यात यश मिळाले. काही जिल्ह्य़ांमध्ये स्थानिक पोलिसांनी पंपांची तपासणी केली होती. पण, त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते.

त्याच पंपांवर आमच्या पथकाने धाडी टाकल्या आणि तेथील चोरी उघड केली. त्यामुळे खरोखरच ही चोरी पकडणे एक आव्हान होते.

* पेट्रोल चोरांची साखळी कशा प्रकारे कार्यरत होती आणि मुख्य सूत्रधार प्रकाश नुलकर याची कार्यपद्धती काय होती?

पेट्रोल चोरीसाठी फेरफार केलेली चिप पुरविण्याचे काम प्रकाश करीत होता. त्यासाठी तो चीनमधून चिपची खरेदी करायचा आणि त्यामध्ये फेरफार करून ती पंपमालकांना कुरिअरद्वारे द्यायचा. त्यानंतर तंत्रज्ञांच्या माध्यमातून पंपमालक यंत्रामध्ये ती चिप बसवून ग्राहकांची फसवणूक करायचे. विविध राज्यांसह चीन, दक्षिण आफ्रिका आणि आबुधाबी या देशांमध्येही त्याने ही चिप पुरविल्याची माहिती समोर आली असून त्यासंबधी सविस्तर तपास सुरू आहे. पेट्रोल चोरी प्रकरणामध्ये प्रकाश नुलकर, विवेक शेटय़े आणि मीनल नेमाडे या तिघांचा सहभाग असल्याचे आढळून आले असले तरी या प्रकरणाचा मास्टरमाइंड प्रकाश हाच आहे. पेट्रोल चोरीसाठी पंपमालकांना चिप पुरविल्याप्रकरणी विवेक शेटय़े याला उत्तरप्रदेश पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच राज्यभरात कारवाई सुरूकरण्यात आली होती. तसेच सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला मीनल नेमाडे हा पेट्रोल चोरीसाठी बनावट प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर पंपमालकांना पुरविण्याचे काम करीत होता.

*  पंपांवर होणारी पेट्रोल चोरी शोधण्यासाठी ग्राहकांनी काय करायला हवे?

मानवी पद्घतीने हाताळली जाणारी पेट्रोल यंत्रे पूर्वी पंपांवर होती. या पंपाद्वारे होत असलेली पेट्रोल चोरी पकडणे सोपे होते. परंतु सात वर्षांपूर्वी पंपांवर इलेक्ट्रॉनिक पेट्रोल यंत्रे बसविण्यात आली आहेत. या यंत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे पेट्रोल चोरी पकडणे सोपे नाही. आमच्या कारवाईनंतर स्थानिक पोलिसांनी जिल्ह्य़ांमधील पंपांची तपासणी केली. पण, त्यात त्यांना काहीच आढळून आले नाही. त्याच ठिकाणी आमच्या पथकाने पुन्हा धाडी टाकून पेट्रोल चोरी उघड केली. कारण, आमच्या पथकाला या संदर्भात प्रशिक्षण दिल्यामुळे ही चोरी पकडणे शक्य झाले. तसेच एखाद्या ग्राहकाने संशयावरून पेट्रोलचे मापन करायची मागणी केली तर पंपचालक यंत्र पूर्ववत करून त्याला पेट्रोल देतात. त्यामुळे पेट्रोलचे मापन योग्य येते. त्यामुळे ग्राहकांना ही चोरी पकडणे शक्य नाही. इंधन कंपन्यांनी आता स्वयंचलित यंत्रणा उभारण्यास सुरुवात केली असून त्यामुळे पेट्रोल चोरीला आळा बसून ग्राहकांना दिलासा मिळेल.

मुलाखत: नीलेश पानमंद / जयेश सामंत