किशोर कोकणे

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात एक बेवारस मृतदेह गोणीमध्ये बांधलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळला. अ‍ॅसिड टाकून त्याचा चेहरा विद्रुप करण्यात आल्यामुळे पोलिसांना त्याची ओळख पटविणे शक्य होत नव्हते. त्यातच दोरीने गळा आवळून त्याचा खून करण्यात आल्याची बाब प्राथमिक तपासात समोर आली होती. त्यामुळे त्याची ओळख पटविण्याचे आणि त्याच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे असे दुहेरी आव्हान ठाणे पोलिसांपुढे होते..

वागळे इस्टेट येथील साठेनगर भागात मोठय़ा प्रमाणात लोकवस्ती आहे. या परिसरात एक कंपनी असून तिच्या प्रवेशद्वारासमोर एक रस्ता आहे. या रस्त्यावरून परिसरातील नागरीकांची वर्दळ सुरु असते. ४ मे २०१८ रोजी सकाळी काही नागरिक कामावर जात असताना त्यांना रस्त्यालगत एक गोणी आढळून आली. या गोणीमधून दुर्गंधी येत होती. त्यामुळे नागरिकांनी वागळे इस्टेट पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वागळे इस्टेट पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहचून गोणीची पाहाणी सुरु केली. पोलिसांनी गोणीला बांधलेला दोरा सोडला आणि त्यानंतर गोणीतील मृतदेह पाहून पोलिसही चक्रावले. मृतदेहाचा चेहरा ऑसिडने विद्रुप करण्यात आला होता. मृतदेहाच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे कपडे होते. मात्र, त्याच्या खिशात काहीच कागदपत्रे नव्हती. यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांना शक्य होत नव्हते. मात्र, या घटनेच्या पाहाणीनंतर हा खूनाचा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांना आला.

मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालामध्ये दोरीने गळा आवळून त्याचा खून करण्यात आल्याची बाब समोर आली. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, मृतदेहाची ओळख पटविण्याचे आणि त्याच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे असे दुहेरी आव्हान ठाणे पोलिसांपुढे होते. मृतदेहाच्या अंगावरील पांढरे कपडे होते. ते रिक्षाचालकाच्या गणवेशाप्रमाणे होते. त्यामुळे मृत व्यक्ती रिक्षा चालकाचा असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. तपासासाठी पोलिसांनी परिसरातील सिसीटिव्ही कॅमेरे तपासले. मात्र, त्यांच्या हाती काहीच धागेदोरे लागले नाहीत. त्यामुळे या खूनाचे गूढ वाढले होते.

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनीटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या पथकाने वरिष्ठांच्या आदेशानुसार या गुन्ह्य़ाचा समांतर तपास सुरु केला. या पथकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, पोलीस उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, श्रीनिवास तुंगेणवार, सहायक पोलिस उपनिरिक्षक बाबू चव्हाण, पोलीस हवालदार देविदास जाधव, दिलीप शिंदे, विजयकुमार गोरे, शिवाजी रायसिंग, पोलीस नाईक राजेंद्र गायकवाड, सागर सुरळकर यांचा समावेश होता. या पथकाकडून मृताची ओळख पटविण्याचे काम सुरु होते. त्यासाठी मृतदेह सापडला त्यादिवशी आणि त्याच्या तीन ते चार दिवस आधीच्या बेपत्ता तक्रारींची माहिती पथकाने विविध पोलिस ठाण्यातून मिळविली. तसेच रिक्षा चालक बेपत्ता आहे का याचाही माहिती घेतली. पण, त्यामध्ये मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी ठोस असे काहीच मिळत नव्हते. तरीही पथकाकडून मृताची ओळख पटविण्यासाठी विविध प्रयत्न सुरु होते.

असे असतानाच चार महिन्यानंतर एका खबऱ्याने भांडूप पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता तक्रारीची माहिती पथकाला दिली. मृतदेह सापडल्याच्या घटनेच्या दिड महिन्यानंतर ही तक्रार दाखल झाली होती. त्यामुळे या तक्रारीचा मृत व्यक्तीचा काहीच संबंध नसावा, असे पोलिसांना वाटत होते. मात्र, तरीही पोलिसांनी या तक्रारीची माहिती घेतली आणि इथेच गुन्ह्य़ाला कलाटणी मिळाली.

बेपत्ता तक्रारीतील व्यक्तीचे आणि मृत व्यक्तीचे वर्णन मिळते-जुळते असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. बेपत्ता व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृतदेहाचे छायाचित्रे पाहून तो मृतदेह त्यांच्या व्यक्तीचा नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झाला. त्यात मृतदेह खराब होऊ लागल्यामुळे पोलिसांनी त्याचा अंत्यविधी केला होता. मात्र, त्यापूर्वी नख, केस आणि दात काढून ठेवले होते. अखेर त्याचा वापर करून पोलिसांनी डीएनए तपासणी केली आणि त्याच्या अहवालामध्ये बेपत्ता तक्रारीतील व्यक्तीचाच हा मृतदेह असल्याचे उघड झाले. शेगर पिल्ले (३५) यांचा हा मृतदेह होता. तो महिना-महिनाभर घरी जायचा नाही. मात्र, यावेळेस दिड महिना उलटूनही तो घरी परतला नव्हता. तसेच त्याचा ठावठिकाणी लागत नसल्याने त्याच्या कुटूंबियांनी दिड महिन्यानंतर तक्रार दाखल केली होती.

ओळख पटल्यानंतर त्याच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वळविली. शेगर याने लेथ मशीन ग्रीजेश याला साडे तीन लाख रुपयांमध्ये विकली होती. मात्र, ही मशीन घेतल्यानंतरही तो पैसे देत नव्हता. या कारणावरून त्यांच्यात वाद झाले होते. अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ग्रीजेशला ताब्यात घेतले आणि त्याने हत्येची कबुली दिली. ३ मे रोजी शेगर हा ग्रीजेशकडे पैसे मागण्यासाठी गेला होता. त्यावेळेस गाळ्यामध्ये ग्रीजेश आणि प्रमोद दोघे होते. ग्रीजेश पैसे देत नसल्याने त्यांच्यात वाद झाले होते. रात्र झाल्यामुळे शेगर गाळ्यातच झोपला. त्यावेळेस ग्रीजेशने प्रमोद गुप्ताच्या मदतीने त्याचा गळा आवळून खून केला आणि ओळख पटू नये म्हणून ज्वलनशील पदार्थ त्याच्या चेहऱ्यावर टाकला. त्यानंतर एका गोणीत मृतदेह भरून तो दुचाकीवरून नेऊन कंपनीच्या परिसरात फेकला. या गुन्ह्य़ात पोलिसांनी प्रमोद गुप्ता यालाही अटक केली.

हे प्रकरण तसं तर तारांकित किंवा समाजात चर्चिलं गेलेलं प्रकरण नव्हतं. पण तरीही पोलिसांनी त्याची फाइलबंद न करता तपास सुरूच ठेवला. खबऱ्याने दिलेल्या माहितीवर पोलिसांचा सुरुवातीला विश्वास नव्हता. मात्र, त्यानंतरही त्यांनी तो धागा हातचा सुटू दिला नाही. त्यामुळे ते शेगरच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू शकले.