ठाणे पोलिसांचे बारमालकांना फर्मान
सरत्या वर्षांचा निरोप आणि नववर्ष स्वागताच्या निमित्ताने होणाऱ्या मद्यपाटर्य़ानंतर होणारे वाहन अपघात रोखण्यासाठी ठाणे पोलिसांनी कडक पावले उचलली असून मद्यविक्री करणाऱ्या बारमालकांनी ग्राहकांच्या वाहनांसाठी चालकाची व्यवस्था करावी, अन्यथा मद्यविक्री करू नये, असे फर्मान काढले आहे. याशिवाय ठाणे ते बदलापूपर्यंतच्या सर्वच बार आणि हॉटेलबाहेर टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांचे दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित करावेत, अशी तंबीही पोलिसांनी दिली आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांच्या मुसक्या बांधण्याचा निर्धार पोलिसांनी केला असून नाताळ अर्थात २५ डिसेंबरपासूनच शहरातील प्रमुख नाक्यांवर श्वासविश्लेषक यंत्राद्वारे पोलिसांची पथके तैनात करण्यात येणार आहेत.
नववर्ष स्वागताच्या निमित्ताने अनेक ठिकाणी करमणूक कार्यक्रम तसेच मेजवान्यांचे आयोजन केले जाते. या ठिकाणी मद्यवाटपही केले जाते. अशा पाटर्य़ाना हजेरी लावणारे तळीराम दारूच्या नशेत गाडी चालवून अपघातांस कारणीभूत ठरतात. नशेत वाहन चालवणाऱ्याच्या जिवावरही बेतू शकते. या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी काही कडक पावले उचलली आहेत. थर्टी फर्स्टच्या रात्री मद्याच्या पाटर्य़ा झोडणाऱ्यांनी घरी परतण्यासाठी स्वत: वाहन चालवू नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करून त्यामध्ये मद्य पुरविणाऱ्या हॉटेल व बार व्यावसायिकांना नोटिसा पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पार्टी आयोजित करताना निमंत्रितांना अथवा त्यात सहभागी होणाऱ्या मद्यपी वाहनचालकांना घरी पोहोचवण्यासाठी वाहनचालकांची व्यवस्था करा, असे या नोटिशीत सांगण्यात आले आहे. सर्वच शहरांमधील विविध नाक्यानाक्यांवर वाहतूक पोलिसांचे पथक फिरणार असून हे पथक श्वास विश्लेषक यंत्राद्वारे मद्यपी चालकांची तपासणी करणार आहे. याशिवाय, येऊरच्या पायथ्याशी वाहतूक पोलिसांचे पथक उभे राहणार असून तिथे चालकांची तपासणी करणार आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.