News Flash

पोपट पान टपऱ्यांच्या शोधासाठी मोहीम

‘पोपट पान’ नावाने अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवरही पथकाकडून कारवाई केली जाणार आहे.

अफू, गांजाच्या विक्रीवर करडी नजर; छापे टाकण्यासाठी पोलिसांची विशेष पथके

ठाणे शहरात राजरोसपणे अफू, गांजा यांसारख्या अमली पदार्थाची विक्री सुरूअसल्याचा दावा महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय नगसेवकांनी केल्यानंतर आता अशा पदार्थाच्या अड्डय़ांवर छापे टाकण्याची तयारी ठाणे पोलिसांनी सुरू केली आहे. या कारवाईसाठी विशेष पथक तयार करण्यात येणार असून त्याच्यामार्फत हे छापे टाकण्यात येणार आहेत. ‘पोपट पान’ नावाने अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवरही पथकाकडून कारवाई केली जाणार आहे.

ठाणे शहरातील ग्लॅडी अल्वारिस मार्गालगत असलेल्या कोठारी कंपाऊंड परिसरात उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांमध्ये लाऊंज बार, हुक्का पार्लर तसेच बडय़ा हॉटेलमधून अमली पदार्थाची विक्री सुरू असल्याचा आरोप गुरुवारी सर्वसाधारण सभेत महापौरांसह नगरसेवकांनी केला. सिद्घांचल, लोकपुरम, वसंत विहार, पवारनगर या भागांत ‘पोपट पान’ नावाने मादक पदार्थाची विक्री केली जात असल्याचा दावा नगरसेवकांकडून करण्यात आला. अशा अड्डय़ांवर कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात आली. नगरसेवकांनी केलेल्या या दाव्यामुळे शहरात खळबळ उडाली. आता ठाणे पोलिसांचीही झोप उडाली असून त्यांनी अड्डय़ांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. अमली पदार्थाविरोधात ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडून सातत्याने कारवाई केली जात असून यापूर्वी इफेड्रिनसारख्या अमली पदार्थाचे रॅकेट उघड केले आहे. शहरातही मादक पदार्थाची विक्री करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्येही मादक पदार्थाविषयी जनजागृती मोहिमा राबविल्या जात आहेत, असे ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी सांगितले. ‘पोपट’ नावाच्या पानाची विक्री करणाऱ्या टपऱ्या आमच्या रडारवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरात अमली पदार्थ विक्रीच्या अड्डय़ांवर छापे टाकण्यासाठी लवकरच विशेष मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी खास पथके स्थापन केली जाणार आहेत. अशा पदार्थाची विक्री करणाऱ्या अड्डय़ांचा शोध घेऊन कारवाई केली जाणार आहे. ‘पोपट’ नावाच्या पानाची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर छापे टाकून त्या पानाची तपासणी केली जाणार आहे.

सुनील लोखंडे, पोलीस उपायुक्त, वागळे विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 3:13 am

Web Title: thane police keeping eyes on opium ganja sale
Next Stories
1 ठाणे पालिकेला उपरती
2 ठाण्यातील तलावांना आता नवी झळाळी
3 आहार, विहार, विचार हीच आरोग्याची त्रिसूत्री
Just Now!
X