बंदोबस्तासाठी साडेतीन हजार कर्मचारी रस्त्यावर ; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

ठाणे : राज्यात बुधवारी रात्रीपासून जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. पुढील १५ दिवस ठोस कारणाशिवाय संचार करण्यास बंदी करण्यात आली आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरांत ३ हजार ५०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकडय़ांनाही पाचारण करण्यात आले आहे. शहरातील सर्व महत्त्वाच्या नाक्यांवर पोलिसांनी अडथळे उभारले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू असल्याने रिक्षा आणि बसचालकांकडे करोना चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आले आहेत. करोना चाचणीचा अहवाल नसणाऱ्या किंवा लस न घेतलेल्या मात्र, रिक्षा, बस घेऊन बाहेर पडलेल्यांविरोधात कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारने बुधवारी रात्री ८ वाजेपासून कठोर संचारबंदी लागू केली आहे. या टाळेबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना विनाकारण फिरण्यास बंदी आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर फिरून नियमांचे उल्लंघन करू नये यासाठी ठाणे पोलिसांनी संपूर्ण आयुक्तालयात कडक बंदोबस्त ठेवला आहे. ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरात ३ हजार ५०० पोलिसांचा फौजफाटा शहरातील रस्त्यावर तैनात करण्यात आला आहे. तर, संवेदनशील आणि ज्या भागात कमी पोलीस बळ आहे त्याठिकाणी राज्य राखीव दलाच्या चार तुकडय़ाही पाठविण्यात आल्या आहेत. ठाणे शहरातील माजिवडा, तीन पेट्रोल पंप, कापूरबावडी, कासारवडवली, बाळकूम या महत्त्वाच्या नाक्यांवर पोलिसांनी बंदोबस्त सुरू केला आहे. याशिवाय ठाणे शहरात बुधवारी सकाळपासून भोंग्याद्वारे नागरिकांना रात्रीपासून बाहेर न पडण्याच्या सूचना पोलीस करत आहेत.

शहरात सार्वजनिक वाहतूक सुरू असणार आहे. मात्र, चालकाला करोना चाचणीचा अहवाल किंवा लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे. एखाद्या चालकाकडे करोना चाचणी अहवाल किंवा लसीकरण प्रमाणपत्र नसल्यास वाहनचालकाविरोधात नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तर, खासगी वाहनचालक विनाकारण वाहन घेऊन बाहेर पडल्यास त्याचे वाहन जप्त करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

नियम मोडणाऱ्यांची खर नाही

गेल्या १५ दिवसांपासून राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात अत्यावश्यक वापर वगळता सर्व दुकाने तसेच कार्यालये बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. असे असतानाही शहरातील अनेक भागात दुकाने तसेच व्यवहार काही प्रमाणात सुरू असल्याचे चित्र होते. रात्री आठनंतर संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. हा नियमही मागील पंधरा दिवसांपासून फार गांभीर्याने पाळला जात नसल्याच्या तक्रारी होत्या. पहाटे तसेच सकाळी व्यायाम तसेच फेरफटका मारण्यासाठी नागरिकांचे जथ्थे बाहेर पडत होते. क्रीडा प्रशिक्षण समूहांचा सरावही शहरातील ठरावीक भागात पहाटेच सुरू होत असे. या सगळ्याकडे कानाडोळा करण्याची भूमिका पोलीस आणि प्रशासनाने घेतली होती. यावेळी मात्र नियमांच्या कठोर अंमलबजावणीचे संकेत पोलिसांकडून मिळत असून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले.