मुंबईच्या धर्तीवर प्रयोग करण्याचे संकेत

मुंबईच्या धर्तीवर ठाणे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाचा कालावधी (डय़ुटी) आठ तास करण्याचे स्पष्ट संकेत राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिले आहेत. ठाण्यातील काही पोलीस ठाण्याच्या उद्घाटनासाठी महासंचालक माथुर हे बुधवारी ठाण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी हे सूतोवाच केले. तसेच यासंबंधी ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी चर्चा केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. आठ तासांच्या कामाच्या कार्यपद्धतीमुळे ठाणे पोलिसांच्या कामाचे चार तास कमी होणार आहेत.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि वागळे अशी पाच परिमंडळे असून त्याअंतर्गत एकूण ३५ पोलीस ठाणी आहेत. ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरापर्यंत कार्यक्षेत्र असलेल्या आयुक्तालय क्षेत्राची लोकसंख्या ८० ते ८५ लाखांच्या घरात पोहचली आहे. ठाणे पोलीस दलात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आकडा सुमारे साडेनऊ हजार इतका असून त्यामध्ये सुमारे १३०० महिला पोलिसांचा समावेश आहे. आयुक्तालय क्षेत्रातील लोकसंख्येच्या मानाने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. आंदोलने, मोर्चे, न्यायालयातील खटले, पोलीस ठाण्यातील कारकुनी कामासोबतच शहरांमधील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि सण, उत्सवांच्या काळातील बंदोबस्त अशी कामे पोलिसांना करावी लागतात. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार असून पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना १२ तास काम करावे लागते. या पाश्र्वभूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी बुधवारी ठाण्यातील एका कार्यक्रमामध्ये बोलताना मुंबईच्या धर्तीवर ठाणे पोलिसांच्या कामाचा कालावधी आठ तास करण्यात येणार असल्याचे सांगितले. सध्या दैनंदिन कामामुळे पोलिसांवर असलेला मानसिक ताण कमी करण्याकडे लक्ष दिले जात आहे. तसेच ठाणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याकडेही लक्ष दिले जात असून ही संख्या वाढल्यानंतर लगेचच याठिकाणी कर्मचाऱ्यांच्या कामाचा कालावधी आठ तास इतका करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचा कालावधी आठ तास करण्याचा विचार सुरू झाला असला तरी ही कार्यपद्धती ठाणे वाहतूक शाखेत गेल्या काही वर्षांपासून राबविली जात आहे. असे असले तरी पोलीस ठाण्यामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना १२ तास काम करावे लागत असून आठ तास कामाचा कालावधी या कार्यपद्घतीचा त्यांना फायदा होणार आहे.