समाज माध्यमांद्वारे नागरिकांशी संवाद; इंटरनेट संदेशांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग
समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह मजकुरामुळे अनेकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. आयसिससारख्या दहशतवादी संघटना अशा माध्यमांचा पुरेपूर वापर करताना आढळून आल्या आहेत. हे लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी समाज माध्यमांवरील संदेशांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, एरवी राबविण्यात येणाऱ्या विविध समाजपयोगी उपक्रमांच्या प्रसिद्धीविषयी उदासीन राहणाऱ्या ठाणे पोलिसांनी उशिरा का होईना फेसबुकवर खाते सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे शहरातील विविध घटकांशी संपर्क साधण्यात येणार असून समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह मजकूर आणि अफवांचे स्पष्टीकरणही दिले जाईल, अशी माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली.
तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांवर समाज माध्यमांचा (सोशल मीडिया) प्रभाव पडल्याने त्याचा वापर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. काही समाजकंटकांमार्फत या माध्यमांचा मोठय़ा प्रमाणावर गैरवापर सुरू असल्याचे दिसून आले असून आक्षेपार्ह मजकुराद्वारे समाजभावना भडकविल्या जात असल्याचे चित्र अनेकदा निर्माण झाले आहे. समाज माध्यमांवरील अफवांच्या संदेशामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होते. आयसिस या दहशतवादी संघटनेकडून देशातील तरुणांची माथी भडकाविण्याचे प्रकार सुरू असून त्यासाठी अशा माध्यमांचा वापर करत असल्याचे बाब विविध तपास यंत्रणेच्या तपासातून पुढे येऊ लागली आहे.
या पाश्र्वभूमीवर समाज माध्यमांवरील संदेशावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या महिनाभरात या विभागाचे कामकाज पूर्णपणे सुरू होईल. ठाणे पोलिसांचे माहिती व जनसंपर्क अधिकारी पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांच्याकडे या विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे, असेही सहपोलीस आयुक्त डुम्बरे यांनी सांगितले.
या विभागामार्फत ठाणे पोलिसांचे अधिकृत फेसबुकचे खाते उघडण्यात येणार असून त्याच्या माध्यमातून हा विभाग नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम करणार आहे. आक्षेपार्ह मजकूर तसेच अफवांच्या संदेशामुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी हा विभाग स्थापन करण्यात आला आहे. समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह मजकुरांमुळे तणाव निर्माण होऊन शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी नव्या विभागामार्फत फेसबुक खात्याद्वारे पोलिसांकडून नागरिकांपर्यंत महत्त्वाचे संदेश पोहचविण्यात येणार आहे. तसेच अफवांच्या संदेशामुळेही नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून त्या संदेशावर पोलीस अधिकृतपणे खुलासा देऊन जनजागृती करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
नागरिकांची मते घेणार
याशिवाय शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबतही नागरिकांची मते जाणून घेतली जाणार आहे. तसेच एखाद्या विषयावर आलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रियांचीही दखल घेतली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.