सहा हजारांहून अधिक जणांविरोधात पोलिसांची दंडात्मक कारवाई

ठाणे : ठाण्यात टाळेबंदीच्या कालावधीत विनाकारण बाहेर पडलेल्या ६७६ जणांविरोधात ठाणे पोलिसांनी कारवाई करून त्यांची वाहने जप्त केली आहेत, तर ६ हजार २४३ जणांविरोधात दंडात्मक कारवाई केली. तसेच मुखपट्टी परिधान न करणे, गर्दी करणे यांसारख्या आदेशांचा भंग करणाऱ्या १०४ जणांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. ठाणे जिल्ह्य़ात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर २ जुलैपासून ठाणे जिल्ह्य़ात टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार टाळेबंदीच्या पहिल्या दिवशीपासून आठ हजार पोलिसांचा फौजफाटा शहरांतील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यावर तैनात करण्यात आला होता. शासकीय नियमानुसार दुचाकीवर केवळ चालकाला आणि कार, रिक्षामध्ये चालकासह तिघांना प्रवासाची परवानगी आहे. अनेकांकडून या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी २ ते ५ जुलै या चार दिवसांत विनाकारण बाहेर पडणाऱ्या ६७६ जणांची वाहने जप्त केली आहेत. यामध्ये ४९८ दुचाकी, १५७ तीनचाकी आणि २१ चारचाकी वाहनांचा सामावेश आहे. यांसह शासनाच्या नियमापेक्षा जास्त प्रवासी नेणाऱ्या ६ हजार २४३ जणांविरोधात प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई केली. यात ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक कारवाई झालेली असून २ हजार ७१३ चालकांचा यात समावेश आहे. तर, संपूर्ण आयुक्तालयात १०४ जणांविरोधात गर्दी करणे, मुखपट्टी परिधान न करणे अशा विविध कारणांसाठी कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कारवाईचा तपशील

विभाग         कारवाई

ठाणे                  २७१३

कल्याण              ७०३

उल्हासनगर        ९३७

भिवंडी              १८९०

एकूण              ६२४३