आदेशात दुकानांचा उल्लेख नसल्याचा दावा

ठाणे : राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या जमावबंदी दरम्यान ठाणे शहर पोलिसांकडून रात्री आठनंतर ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील दुकाने सक्तीने बंद केली जात आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे तसेच संभ्रमाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी व्यापारी आणि पोलीस यांच्यामध्ये वादाचे प्रसंगही निर्माण झाले आहेत. राज्य सरकारने काढलेल्या आदेशात दुकानांसंबंधी कोणताही ठोस उल्लेख नसताना आठनंतर ती कोणत्या नियमांच्या आधारे बंद केली जात आहेत, असा सवाल व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे रविवारपासून संपूर्ण राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये रात्री पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना जमावाने फिरण्यास मनाई आहे. मॉल, मद्यालये, उपाहारगृहे आणि सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी मार्गदर्शन सूचनांची आणि निर्बंधांची अंमलबजावणी होत नसल्यास कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. तसेच शहरातील मॉल रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेशही आहेत. या आदेशामध्ये दुकाने बंद ठेवण्याचा कोणताही उल्लेख नाही. त्यानंतरही ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर भागात पोलिसांकडूनच दुकाने बंद केली जात आहेत. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याची सक्ती पोलिसांकडून केली जात आहे. त्यामुळे व्यापारी हैराण आहेत. आम्ही करोनाचे नियम पाळून व्यवसाय करत असतानाही  दुकाने बंद केली जात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना संपर्क साधून दुकाने सक्तीने बंद केली जात असल्याबाबत विचारले असता, त्यांनी प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.

व्यापाऱ्यांमध्ये आदेशाविषयी संभ्रम

यासंदर्भात काही व्यापारी संघटनांशी संपर्क साधला असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, कनिष्ठ पोलीस कर्मचारी आमची दुकाने बंद करण्यासाठी येत असतात. काही वेळा व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर ते वरिष्ठांशी बोलून निघून जातात. मात्र जे व्यापारी विरोध करत नाहीत. त्यांना दुकान बंद करण्याची सक्ती केली जाते. व्यापाऱ्यांमध्ये आदेशाविषयी संभ्रम आहे. त्यामुळे आम्ही आता समाजमाध्यमांवर व्यापाऱ्यांना रात्रीच्या वेळी नियमांचे पालन करून दुकाने सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. टाळेबंदीमुळे व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यात पुन्हा सक्तीची बंदी असल्याने आता व्यवसाय कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.