ठाणे पोलिसांची परिवहन उपक्रमास सूचना
ठाणेकर प्रवाशांना दळणवळणाची प्रभावी सुविधा पुरविण्यास अपयशी ठरलेला महापालिकेचा परिवहन उपक्रम बसचालक गजानन शेजुळ याच्या मद्य प्रतापामुळे पुन्हा एकदा वादात सापडला आहे. अशा घटनेची पुनरावृत्ती रोखली जावी यासाठी ‘टीमटी’च्या ताफ्यातील प्रत्येक वाहन चालकाची यापुढे मद्य तपासणी करण्यात यावी अशा स्वरूपाचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे पाठविला आहे. टीएमटीच्या दररोज सुमारे २०० गाडय़ा ठाण्यातील विवीध मार्गावर धावत असतात. त्यामुळे भविष्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी वाहन चालविण्यापूर्वी प्रत्येक चालकाची श्वास विश्लेषक यंत्राद्वारे तपासणी करावी, अशा सूचनाही पोलिसांकडून केल्या जाणार आहेत.
मद्यधुंद अवस्थेत बेदरकार गाडी चालवणाऱ्या गजानन शेजूळ या टीएमटी चालकाच्या बसच्या धडकेने वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी चंद्रकांत साळुंखे यांचा मृत्यू झाला होता. चालकाने मद्यप्राशन केल्याचे समजल्यानंतर गाडीतील ४० प्रवासी आणि वाहक सुनील नागरे हे बसमधून वेळीच खाली उतरल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, या घटनेनंतर टीएमटीमधील चालकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर बस आगाराबाहेर येण्यापूर्वी सर्वच चालकांची श्वास विश्लेषक यंत्राद्वारे दररोज नियमित तपासणी करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र महापालिकेस देण्यात येईल, असे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली.
घोडबंदर येथील गायमुख भागातील अपघातानंतर टीएमटीचा बसचालक शेजूळ याची श्वास विश्लेषक यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये त्याच्या शरीरात ७२९ मिलीग्रॅम इतके मद्याचे प्रमाण आढळून आले आहे. मद्य तपासणीदरम्यान ३० मिलीग्रॅम आणि त्यापेक्षा अधिक प्रमाण आढळून आले तर अशा चालकाविरोधात कारवाई करण्यात येते. यामुळे शेजूळ हा त्याहून कैकपटीने जास्त मद्याच्या नशेत असल्याचे आढळून आले आहे.