भव्य गृहसंकुलांतील रहिवाशांची सार्वजनिक नळाकडे धाव
दिवसेंदिवस उग्र होत चाललेल्या पाणीप्रश्नाने ठाण्यातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या मध्यवर्ती भागात अधिक गंभीर रूप धारण केले असून या परिसरांत पाण्यासाठी रहिवासी सार्वजनिक नळांकडे धाव घेऊ लागले आहेत. अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे बाटलीबंद पाण्यावर या रहिवाशांची भिस्त होती. मात्र या पाण्याचाही आता तुटवडा भासू लागल्याने परिसरातील सार्वजनिक नळ, विहिरी, बोअरवेल अशा ठिकाणी पाण्यासाठी झुंबड उडाल्याचे चित्र मंगळवार आणि बुधवार या दोन दिवशी दिसून येत होते.
ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ आणि महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठय़ाला पाटबंधारे विभागाकडून पाणीकपातीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील विविध भागांमध्ये मंगळवार ते शनिवार दरम्यान पाणीकपातीचे वेळापत्रक देण्यात आले आहे. मात्र या आठवडय़ामध्ये सोमवारपासून पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याने शहरातील काही भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. स्टेमकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून बंद होतो. त्याच वेळी महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे महापालिकेला पाणीपुरवठा करणे जमले नाही. त्यामुळे रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. तसेच यासंदर्भात कोणतीही सूचना न देण्यात आल्याने नागरिकांची पुरती तारांबळ उडाली. त्यामुळे मोठमोठय़ा गृहसंकुलातील रहिवासी सार्वजनिक नळ, विहिरी वा बोअरवेलवर रांगा लावत असल्याचे चित्र गेले दोन दिवस दिसत होते.
या भागांना सकाळी व संध्याकाळी महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून मंगळवारी पाणीपुरवठा होतो. मात्र या आठवडय़ात हा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होता. तर बुधवारी वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा बंद असल्याने पाणी संकट कायम होते. गुरुवारनंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

या भागांना फटका
समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतुपार्क, जेल, साकेत, उथळसर, जॉन्सन, इंटर्निटी, घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, बॉम्बे कॉलनी, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग.

बाटलीबंद पाण्याचाही तुटवडा
पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर तात्काळ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी बाटलीबंद पाण्याची मागणी केली जाते. त्यामुळे पाणी विक्रीची संख्या कमालीची वाढल्याचे कोपरी येथील पाणी विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. शहरातील वेगवेगळ्या भागांमधील छोटय़ा दुकानांमध्ये पाण्याच्या बाटल्यांची संख्या मर्यादित असल्याने या बाटल्या लवकर संपून जात असल्याने रहिवाशांना शहरातील दुसऱ्या टोकावर जाऊन पाणी बाटल्या आणाव्या लागतात.

स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या योजनेतून पाणी पुरवठा होत असतो मात्र या जलवाहिनीतील बिघाड दुरुस्त करावा लागल्याने मंगळवारी सकाळ संध्याकाळ होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. मात्र पुढील दोन दिवसांमध्ये हा पाणीपुरवठा सुरळीत होईल.
– रवींद्र खडताळे, उपनगर अभियंता, पाणीपुरवठा विभाग.