ठाणे स्थानकातील सरकते जिने नादुरुस्त

मोठा गाजावाजा करत जानेवारीत लोकार्पण केलेले ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवरील कल्याण दिशेकडील चढते आणि उतरते सरकते जिने तसेच फलाट क्रमांक एकवरील कल्याण दिशेकडील सरकते जिने वरचेवर बंद होत आहेत. यापैकी दोन क्रमांक फलाटावरील नवा जिना तर गेल्या पाच दिवसांपासून पूर्णपणे बंद आहे. या जिन्यांच्या पायऱ्या उंचीला मोठय़ा असतात. त्यावरून पायपीट करताना प्रवाशांची दमछाक होत आहे.

वाढत्या प्रवासी संख्येमुळे ठाणे स्थानकाचे महत्त्व वाढले असून रेल्वे प्रशासनाने त्या दृष्टीने या ठिकाणी आधुनिक सुविधा पुरविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गेल्या काही वर्षांत या स्थानकात सरकते जिने बसविण्यात आले आहेत. मात्र, हे जिने वरचेवर बंद होत असल्याच्या तक्रारी वाढत असून नुकतेच बसविण्यात आलेले जिनेही गेल्या पाच दिवसांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. यासंबंधी ठाणे रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक सुरेंद्र महिदर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण तांत्रिक बाबीविषयी कोणतीही टिप्पणी करू शकत नाही, असे सांगितले. ठाणे स्थानक संचालक सुरेश नायर यांना वारंवार संपर्क साधूनही तो होऊ शकला नाही.

जिने अंधारातच!

फलाट क्रमांक तीनवरील मध्यभागी असलेल्या पादचारी पुलाचे सरकते जिने सुरू असले तरीही येथील विद्युत दिवे बंद असल्याने प्रवाशांना अंधारातच प्रवास करावा लागत आहे. या जिन्यांवरील पायाजवळ असलेले विद्युत दिवे सुरू आहेत, तेवढाच काय तो दिलासा!