News Flash

नवीन वाहनतळाचे शुल्क सुसह्य

वाहनतळातील तळमजल्यावर दुचाकी वाहने उभी करण्यासाठी रेल्वे विभागाने दरपत्रक जाहीर केले आहे.

 

रेल्वे स्थानक परिसरात वाहनचालकांना दिलासा; पूर्वेकडच्या दरानेच शुल्कआकारणी

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या वाहनतळात वाहने उभी करण्यासाठी जादा शुल्क मोजावे लागेल, ही प्रवाशांची भीती दूर झाली आहे. या वाहनतळावर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील वाहनतळाप्रमाणेच शुल्क आकारणी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, या ठिकाणी दुचाकी पार्किंगला दोन तासांसाठी दहा रुपये तर १२ तासांपेक्षा जास्त वेळेसाठी ४० रुपये मोजावे लागतील. याशिवाय, या ठिकाणी २४ तास हेल्मेट ठेवण्यासाठी दोन रुपये शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.

ठाणे पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकबाहेरील जागेवर दुमजली वाहनतळ उभारणीचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या वाहनतळाच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून तो बुधवारी सायंकाळपासून खुला करण्यात आला. या नव्या वाहनतळात गाडय़ा उभ्या करण्यासाठी वाढीव दर आकारले जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात मात्र हे दर आवाक्यात असल्याचे आता स्पष्ट होत आहे.

वाहनतळातील तळमजल्यावर दुचाकी वाहने उभी करण्यासाठी रेल्वे विभागाने दरपत्रक जाहीर केले आहे. या दरपत्रकानुसार दुचाकी वाहनांसाठी पूर्वीप्रमाणेच दर ठेवण्यात आले आहेत. याशिवाय, महिन्याच्या मासिक पासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून या पासासाठी चारशे रुपये आकारले जाणार आहे. या ठिकाणी चोवीस तास हेल्मेट ठेवले तर त्यासाठी दोन रुपये शुल्क आकारले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उर्वरित कामांवर निधीचे संकट

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे उभारण्यात येत असलेल्या या वाहनतळाच्या तळमजल्याचे काम पूर्ण करण्यात आले असले तरी, उर्वरित मजल्यांचे काम मात्र अपूर्णच आहे. वाढीव निधीअभावी वाढीव मजल्यांचे काम रखडले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात काही बेकायदा वाहनतळांमधून प्रवाशांची लूट सुरू असल्याच्या तक्रारी यापूर्वी आल्या आहेत. असे असताना रेल्वे प्रशासनाने उभारलेले वाहनतळ बुधवारी सायंकाळपासून सुरू झाल्याने दुचाकीचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 3:17 am

Web Title: thane railway station parking parking charges
Next Stories
1 वृक्षलागवडीसाठी वनविभागाची हरितसेना
2 शाळेतील पहिल्या पावलाचा ठसा
3 सीमेंट रस्त्याला डांबराचा आधार
Just Now!
X