रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी नियंत्रण रेषेपुढील बांधकामे पाडणार
पोखरण रस्त्यालगत असलेली बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करून कॅडबरी जंक्शनचा मार्ग प्रशस्त करण्यास सुरुवात करणाऱ्या ठाणे महापालिकेने आता ठाणे रेल्वे स्थानक परिसर मोकळा करण्याची योजना आखली आहे. ठाणे रेल्वे स्थानकालगत असलेल्या सुभाष पथ, छत्रपती शिवाजी पथ, स्टेशन रोड तसेच एम. एच. हायस्कूल मार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून या भागातील इमारतींसाठी ठरवून देण्यात आलेल्या नियंत्रण रेषेपुढे आलेली बांधकामे पाडण्यात येतील, अशी माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. हा सगळा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असून या ठिकाणी कोंडीमुक्त प्रवासासाठी रुंदीकरण करावेच लागेल आणि त्यासाठी बेकायदा बांधकामांवर हातोडा फिरवावा लागेल, असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
पोखरण रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली असून स्थायी समितीच्या मंजुरीनंतर या कामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. जयस्वाल यांनी शहरातील इतर भागांमधील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश शहर विकास विभागास दिले आहेत. त्यानुसार वेगवेगळ्या भागांत विकास हस्तांतरण हक्क प्रदान करण्याचे प्रस्ताव तयार केले जात असून कोंडीमुक्त ठाण्यासाठी या प्रस्तावांची आखणी केली जात असल्याचा दावा प्रशासनामार्फत केला जात आहे. हे करत असताना ठाणे रेल्वे स्थानक परिसराच्या रुंदीकरणाचे शिवधनुष्य हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या काळात मूळ शहरातील बेकायदा बांधकामांवरही हातोडा चालविण्याची तयारी प्रशासनाने केली असल्याचे संकेत जयस्वाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मध्य रेल्वेच्या अहवालानुसार ठाणे स्थानकातून दररोज सुमारे सहा लाख प्रवासी ये-जा करत असतात. हा आकडा भविष्यात वाढण्याची चिन्हे असून मूळ शहरातून स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखांच्या घरात आहे. त्यामुळे सकाळ-सायंकाळी गर्दीच्या वेळेत स्थानकाच्या दिशेने जाणारे रस्ते कोंडीमय होतात असा अनुभव आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून उपाय योजले जात असले अरुंद रस्त्यांमुळे ते फारसे प्रभावी ठरत नाहीत. हे लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी बेकायदा बांधकामे पाडण्याची तयारीही सुरू केली आहे.
या भागात इमारतींच्या नियंत्रण रेषेपुढे आलेली सर्व बांधकामे पाडली जाणार आहेत. त्यासंबंधीचा आराखडा तयार करण्यात येणार असून महापालिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाईंदर पाडा परिसरातील काही रस्त्यांच्या रुंदीकरणाचे प्रस्तावही येत्या काळात तयार केले जाणार आहेत.