ऐतिहासिक ख्याती असणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. येत्या काही दिवसात रेल्वे स्थानक परिसरातीलजागा खाजगी करणाच्या माध्यमातून म्हणजेच (पीपीपी तत्वानुसार) विकसित केली जाणार आहे.  यासाठी २०० कोटींची निविदा काढण्यात येणार आहे. देशातील एकूण २३ रेल्वे स्थानकांचा मेकओव्हर करण्याचे रेल्वे मंत्रालयाने ठरवले असून यात महाराष्ट्रातील ठाणे स्थानकासह सहा स्थानकांची निविदाप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ठाण्यातील प्रवासी संघटनासह प्रवाशांची देखील याच स्वागत केले आहे.

देशातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ साली बोरीबंदर ते ठाणे मार्गावर धावली होती. आजच्या घडीला ठाणे स्थानकातून तब्बल ७ ते ८ लाख प्रवाशी प्रवास करतात. मात्र, स्थानकाला ऐतिहासिक वारसा असूनही अद्याप पुरेशा सोयीसुविधा नसल्याची ओरड रेल्वे प्रवाशी संघटनाकडून होत होती. आता खाजगीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी ठाण्यातील नागरिकांना आद्ययवत सोई-सुविधा मिळणार आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात रेल्वे प्रशासनाने ठाणे स्थानकाचा मेकओव्हर करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने स्टेशन फॅसिलेशन मॅनेजर्स (SFM) या संस्थेद्वारे विविध खाजगी कंपन्यांशी (पीपीपी तत्वावर) करारनामे करून तब्बल २०० कोटींचा खर्च प्रस्तावित केला आहे. प्रत्यक्ष सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात होण्यासाठी ठाणेकरांना आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार असली तरी लवकरच स्थानकाचा कायापालट होणार यामुळे ठाणेकरांसाठी ही आनंदाचीच बातमी आहे. वातानुकुलीत स्वच्छतागृहे, अल्पदरात शुद्ध पाणीपुरवठा आदी अनेक कामे यापूर्वीच झाली आहेत. ठाण्यातील प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्याना थांबा देण्यात आल्याने नुकताच ठाणे पूर्व-पश्चिम जोडणारा पादचारी पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला असून, कल्याणच्या दिशेच्या पादचारी पुलाचे कामदेखील प्रगतीपथावर आहे.

दरम्यान, स्टेशनच्या सुशोभीकरणासाठी प्राधान्य दिले असले तरी स्टेशनमधील नादुरुस्त एटीव्हीएम मशीन व अपुऱ्या तिकिट खिडक्या, बिघडलेले स्कॅनर व मेटल डिटेक्टर, फलाटांची उंची कमी आणि स्थानक परिसरातील घाण, कचरा, जुन्या झालेल्या जलवाहिन्या बदलणे यासारख्या कामालाही प्राधान्य देण्यात येणार आहे.