विजय वागळे, ठाणे
‘लोकसत्ता ठाणे’ अंकातील ‘आठवडाभरात एक हजार साठ रिक्षाचालकांवर गुन्हे’ हे वृत्त वाचले. कल्याण शहरातील रिक्षाचालकांची मुजोरी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल योग्यच आहे. अशाच प्रकारची कारवाई ठाणे शहरातही वाहतूक पोलिसांकडून केली जावी. ठाण्यात दिवसेंदिवस रिक्षाचालकांची मुजोरी वाढताना दिसत आहे. रिक्षात चौथ्या प्रवाशाला बसविणे हे नियमांविरोधात आहे. परंतु या नियमाची पायमल्ली शहरातील बहुतेक रिक्षाचालक करताना दिसत आहेत. आज ठाण्यात तीस हजारहून अधिक रिक्षा आहेत. रिक्षा प्रवासादरम्यान लांबचे भाडे नाकारणे, मीटर जलद करणे, मीटरप्रमाणे भाडे न आकारणे अशा विविध प्रकारच्या समस्या प्रवाशांसमोर येत असतात. रिक्षाचालकांच्या वाढत्या मुजोरीला कंटाळून प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात कित्येकदा खटके उडतात. अशा वेळी रिक्षाचालक उर्मट, अर्वाच्च भाषेत प्रवाशांशी बोलतात. नितीन कंपनी, गावदेवी, लोकमान्यनगर, वागळे इस्टेट आदी परिसरातील रिक्षा थांबे रिक्षाचालकांच्या दादागिरीची उत्तम उदाहरणे आहेत. परिवहन खात्याचे अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई करतात; परंतु ती तात्पुरती असते. रिक्षाचालकांना ‘भाडेवाढ’ हवी असल्यास रिक्षा संघटनेचे नेते ‘रिक्षा बंद आंदोलन’ करतात. परंतु रिक्षाचालकांना सौजन्याचे धडे देणे मात्र सोयीस्कररीत्या टाळतात. रिक्षाचालकांवर वाहतूक पोलीस तरी किती अंकुश ठेवणार? रिक्षाचालक एवढे चालाख झाले आहेत की, पोलीस जिथे उभे असतील तिथून रिक्षा नेताना आधी चौथ्या प्रवाशाला खाली उतरवतात. रिक्षा थोडी पुढे गेली की, हा उतरलेला चौथा प्रवासी पुन्हा रिक्षात येऊन बसतो. असे ठिकठिकाणी घडत असल्यास पोलीस तरी काय करणार हा प्रश्न निर्माण होतो. रिक्षाचालकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांचे परवाने रद्द करणे गरजेचे आहे. नागरिकांनी रिक्षाचालकांविरोधात जन आंदोलन करणे गरजेचे आहे. असे झाले तरच हे रिक्षाचालक वठणीवर येतील.
कल्याणात रिक्षाचालकांची ‘गुंड’गिरी
समीर कानिटकर, कल्याण
कल्याणातील आग्रा रोड रस्त्यावरील गणेश टॉवर परिसरात असणाऱ्या रिक्षा थांब्यातील रिक्षाचालकांकडून रिक्षा प्रवाशांना वारंवार दमदाटी करण्यात येत आहे. कल्याणातील आग्रा रोड रस्त्यावरील गणेश टॉवर परिसरात अधिकृत रिक्षा थांबा आहे. येथून कल्याण रेल्वे स्थानक परिसरात जाण्यासाठी त्याचप्रमाणे कल्याणातील इतर भागात जाण्याची सोय आहे. गणेश टॉवर ते कल्याण रेल्वे स्थानक या प्रवासासाठी शेअर दरपत्रकानुसार प्रत्येकी दहा रुपये दर आकारणे बंधनकारक आहे.
गणेश टॉवर येथील रिक्षाचालकांची येथील परिसरात दहशत आहे. त्यामुळे सकाळचा वेळ सोडल्यास गणेश टॉवर रिक्षा थांब्यावरील रिक्षाचालक कल्याण रेल्वे स्थानक परिसरात जाण्यास उत्सुक नसतात. कारण या रिक्षाचालकांना मेट्रो मॉल, खडकपाडा, सिनेमॅक्स, गोदरेज हील, डी-मार्ट अशी लांबची व थेट भाडी हवी असतात. शहरात दर आकारणी संदर्भात मीटर पद्धत नसल्यामुळे हे रिक्षा चालक मनाला वाटेल त्याप्रमाणे भाडे आकारणी करीत असतात. शहराच्या या मध्यवर्ती ठिकाणी लाल चौकी, भिवंडी, कोन येथून येणाऱ्या रिक्षाचालकांचाही गराडा असतो. गणेश टॉवर येथील या रिक्षाचालकांच्या दमदाटीस कंटाळून रिक्षा प्रवासी भिवंडी, कोन, लाल चौकीहून येणाऱ्या रिक्षावाल्यांशी आपल्या इच्छितस्थळी जाण्याविषयी विचारणा करतात. परंतु भिवंडी, कोन, लाल चौकीहून येणाऱ्या रिक्षाचालकांना गणेश टॉवर परिसरातील रिक्षाचालक दमदाटी करून पळवून लावतात. त्यामुळे येथील रिक्षा प्रवाशांना प्रवासासाठी अडचणी निर्माण होतात व इच्छित स्थळी जाता येत नाही. परिणामी रिक्षा प्रवाशांना आपल्या प्रवासासाठी गणेश टॉवर रिक्षा थांब्यातील मुजोर रिक्षाचालकांचा पर्याय स्वीकारावा लागतो.
‘रूपी’ग्रस्त ठेवीदारांना न्याय कधी मिळणार?
रमेश मोरे, ठाणे
गेली दोन वर्षे रूपी बँकेचे व्यवहार बंद आहेत. लवकरात लवकर या बँकेचे दुसऱ्या एखाद्या बँकेत विलीनीकरण केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र आता २०१५ संपत आले तरी त्या दृष्टीने कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. हजारो ठेवीदारांचे पैसे या बँकेत गुंतले आहेत. त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. काही गुंतवणूकदार तर हयातही नाहीत. यासंदर्भात बँकेत चौकशी केली तर व्यवस्थापक लवकरच बँक सुरू होईल, असे आश्वासन देतात. बँकेचे बाकी सर्व कामकाज सुरळीत सुरू असलेले दिसते.
कर्मचारी वेळेवर येतात. काम करतात. त्यांना त्यांचे वेतन मिळते. ठेवीदारांना मात्र कुणीही वाली नाही. बँक बुडित खात्यात जाण्यास जे जबाबदार आहेत, त्यांना कडक शासन करून दोष नसलेल्या ठेवीदारांना खरे तर दिलासा देणे शासनाचे कर्तव्य आहे. मुलांचे शिक्षण आणि भवितव्याची सोय म्हणून मी ठाण्यात आल्यापासून रूपी बँकेत ठेव स्वरूपात पैसे गुंतविले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी ते उपयोगी पडतील, या हेतूने ते पैसे ठेवले आहेत. माझ्या मुलीने दंतवैद्यक अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे. त्यासाठी वार्षिक शुल्कच ३ लाख २५ हजार रुपये आहे. आमच्या ठेवींपैकी पहिल्या वर्षी बँकेकडून फक्त ५० हजार रुपये मिळाले. उर्वरित पैसे कुठून आणायचे? हक्काचे पैसे असूनही मिळत नसल्याने खूप मन:स्ताप होतो.