येथील इंदिरा चौकात वाशी बस स्टॉपच्या समोरच गेले महिनाभर रस्त्याचे काम सुरूआहे. पावसाळ्याअगोदर रस्त्यावरील मातीचे ढिगारे हटवून चालू स्थितीत असलेले काम पूर्ण करण्याची घोषणा पालिका प्रशासनाने केली होती. त्यांनी स्वत:च या घोषणेचे पालन केलेले नाही. इंदिरा चौकाजवळ असलेल्या वाशी बसस्टॉपच्या येथे भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी तसेच इतर कामासाठी खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्डय़ातून काढलेली माती येथेच बाजूला टाकलेली आहे. पावसाला सुरुवात झाली असून या कामाचा नागरिकांना त्रास होत आहे. येथेच रिक्षा थांबाही आहे. सकाळ-संध्याकाळी येथे बरीच गर्दी होते. या गर्दीतून वाढ काढीत पावसात छत्री पकडत वाशी बस पकडावी लागते. हे काम लवकर पूर्ण करावे तसेच येथील मातीचा ढिगारा हटवावा, ऐवढीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

शिवाजी चौकास असुविधांचा वेढा
अनिल शिंदे, अंबरनाथ
अंबरनाथ पूर्व विभागातील शिवाजी चौकाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. य.मा. चव्हाण खुले नाटय़गृह आणि त्यापुढील मैदान हटवून तिथे वाहनतळ उभारण्याचा प्रकल्प पालिकेने राबविण्यास सुरुवात केली. तो अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. या अतिशय बेढब वास्तूने शहर सौंदर्यीकरणाचे बारा वाजवले आहेत. स्थानकाजवळील एक चांगले मैदान त्यामुळे शहरवासी गमावून बसले आहेत. आता जरा पाऊस पडला की चौकात पाणी तुंबून नागरिकांना चालणेही मुश्कील होते. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरच मोठय़ा प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे ते घाण पाण्यात पाय बुडवूनच नागरिकांना गाडी पकडावी लागते. गेली काही वर्षे सातत्याने या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर पाणी तुंबूनही पालिका प्रशासन त्यावर उपाय शोधताना दिसत नाही.
चौकाला चारही बाजूंनी फेरीवाले, खाद्यपदार्थाच्या हातगाडय़ा आणि रिक्षा चालकांचा वेढा पडलेला असतो. पालिका प्रशासनाचा अतिक्रमण विभाग काही वेळा या अतिक्रमणांवर कारवाई करतो. मात्र त्यांची पाठ वळताच फेरीवाले पुन्हा चौकात आपले बस्तान बसवितात. पालिका प्रशासनाने किमान रेल्वे मार्गाच्या वाटेवर पाणी का साचते याचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करावा, अशी कळकळीची विनंती करावीशी वाटते.