कल्याण महापालिका निवडणुकीचे घोडे एकदाचे गंगेत न्हाले. एकमेकांच्या नरडय़ाला नख लावून, उरावर बसून पुन्हा एकदा सत्तेत गळ्यात गळे घालून शिवसेना आणि भाजप विराजमान झाले. दोन्ही पक्ष कदाचित कडोंमपा निवडणुकीच्या रणसंग्रामात एकमेकांची काढलेली उणीदुणी सत्तेचे लोणी मिळाल्यानंतर विसरतील, परंतु लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून निवडून दिलेले आहे हे त्यांनी विसरता कामा नये. ‘स्मार्ट सिटी’ संदर्भात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी आपल्या कामातून करावी. प्रथम कल्याण रेल्वे स्थानक परिसर मोकळा करून म्हातारे, नागरिक यांना नीट चालता येईल, फेरीवाले हटवून पदपथ मोकळे होतील, रिक्षा नीट रांगेत उभ्या राहतील. आधारवाडी, पुण्योदय, उंबर्डे, गांधारी येथे बसच्या फेऱ्या रात्री अकरा वाजेपर्यंत वाढतील हे पहावे. त्याचप्रमाणे डोंबिविली शहरातील दुर्दशा दूर करणे गरजेचे आहे. आतापर्यंत शहराची जी वाट लावली ते पुरे झाले. नागरिकांच्या सहनशीलतेचा कडेलोट होत आहे. महापालिका अधिकारी आणि राजकीय पुढारी आपल्या जबाबदारीचे एक ‘जबाबदार’ नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडतील काय?

 

पोलिसी उर्मटपणा!
अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण</strong>
१ नोव्हेंबर २०१५ रोजी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी मी, माझी पत्नी आणि ८६ वर्षांची वयोवृद्ध आई असे मतदान केंद्रावर गेलो. वृद्धांना प्राधान्य असल्याने आईचे मतदान लगेच झाल्यावर मतदान केंद्राच्या व्हरांडय़ात असलेल्या ओटय़ावर आईला बसवून मी आणि माझी पत्नी मतदानाच्या रांगेत उभे राहिलो. ओटय़ावर इतरही काही वयोवृद्ध व्यक्ती, महिला बसलेल्या होत्या. काही वेळातच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी हे मतदान केंद्रावर आले आणि मतदान केंद्राच्या व्हरांडय़ातील ओटय़ावर बसलेल्या व्यक्तींना तेथे बसण्यास त्यांनी मनाई करण्यास सुरुवात केली. मी ताबडतोब मतदानाची रांग सोडून पोलीस अधिकाऱ्याजवळ गेलो आणि माझे आणि पत्नीचे मतदान झालेले नसल्याने माझ्या आईला तेथील ओटय़ावर बसून द्यावे, असे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सूर्यवंशी यांनी माझ्यावरच डाफरायला सुरुवात केली आणि अतिशय उद्दामपणाची, उर्मटपणाची वर्तणूक केली. आजींना बाहेरच्या मैदानात खुर्ची देऊन बसवा, अशी बरोबर असणाऱ्या हवालदारास सूचना केली. पोलीस अधिकाऱ्याची अरेरावी पाहून हतबल व्हायला झाले. सुदैवाने काही वेळात माझा मुलगा मतदान केंद्रस्थळी पोहोचला आणि आमच्या चारचाकी वाहनातून आईला घरी घेऊन गेला. मात्र या घटनेने माझ्या मनातील पोलिसांची प्रतिमा अधिक ढासळली आहे.

 

सण संपले तरी फलक कायम
जान्हवी पवार, ठाणे</strong>
नेते, पुढाऱ्यांचे, वाढदिवस, अन्य समारंभ आणि विविध कारणांसाठी फलकबाजी करून शहरे विद्रुप करणाऱ्यांवर आणि कारवाईसाठी टाळाटाळ करणाऱ्या महापालिकांना मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला होता. परंतु त्या दणक्यांचा काहीच परिणाम दिसून येत नाही. ज्या महापालिका शहरातील बेकायदेशीर होìडग काढून टाकत नाहीत, बेकायदेशीर होर्डिग लावणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत, अशा महापालिकाच बरखास्त करायचा इशाराही न्यायालयाने दिल्यामुळे, गल्लीबोळातल्या पुढाऱ्यांच्या, नगरसेवकांच्या, आमदार-खासदारांच्या अभिनंदनाचे शेकडो होर्डिग लावून चमकोगिरी करणाऱ्या संबंधितांना चांगलाच चाप बसेल असे वाटले होते. मात्र सद्य परिस्थिती पाहता परिस्थिती जैसे थे आहे.
प्रत्येक होर्डिगवर पालिकेच्या परवानगीचा नंबर आणि कालावधीचा उल्लेख करायची अट घातली गेली होती, परंतु या नियमाचे पालन कुणीच करताना दिसून येत नाही. पुढाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त किती मोठी आणि किती होर्डिग लावावीत, याला धरबंधच राहिलेले नाही. ४० फूट उंच, ३० फूट रुंदीची प्रचंड होर्डिग शहराच्या मुख्य मार्गावर आणि गल्लीबोळातही लावायचे फॅड जागोजागी बोकाळले आहे.