दिवाळी सणाचा आठवडा संपताच महापालिकेने आता पुन्हा पूर्वीप्रमाणे पाण्याचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे शहराचा पाणीपुरवठा प्रत्येक बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळी सणानंतर ठाणेकरांवर पुन्हा पाणीसंकट ओढवल्याचे चित्र आहे.
यंदा दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जलसाठय़ांमधील पाणी पुढील वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंत पुरविण्यासाठी शहरांमध्ये ३० टक्के पाणीकपात ऑक्टोबर महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे तसेच आसपासच्या शहरातील नागरिकांवर पाणीसंकट ओढवल्याचे चित्र होते. त्यातच दिवाळीचा सण आल्यामुळे नागरिक आणखी चिंताक्रांत झाले होते. या पाश्र्वभूमीवर दिवाळी सणाच्या काळात ठाणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये आणि या काळात ठाणेकरांना मनसोक्त अभ्यंगस्नान करता यावे, यासाठी ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी महापालिका प्रशासनाला पाणीकपात रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने दिवाळी सणाकरिता एक आठवडा पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, दिवाळी सणाचा आठवडा उलटल्याने प्रशासनाने आता पूर्वीप्रमाणेच पाणीकपात लागू करण्यास सुरुवात केली असून त्यानुसार प्रत्येक बुधवारी ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

येत्या बुधवारी पाणी नाही
ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना व स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा यापुढे दर बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत घोडबंदर रोड, पाचपाखाडी, ऋतुपार्क, साकेत, महागिरी, लोकमान्यनगर, नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, पातलीपाडा, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, बॉम्बे कॉलनी, संजयनगर व कळवा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.

‘एमआयडीसी’चा पाणीपुरवठा ४८ तास बंद
ठाणे महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा दर गुरुवारी व शुक्रवार बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवार १८ नोव्हेंबर रोजी रात्री १२ ते शुक्रवार २० नोव्हेंबर रोजी रात्रौ १२ पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत कळवा, मुंब्रा, दिवा, बाळकुम पाडा क्रमांक १, कोलशेत या परिसराचा पाणी पुरवठा (४८ तास) बंद राहणार आहे. रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर, बॉम्बे कॉलनी या भागात पाणीपुरवठा सुरळीत असेल. या पाणी बंद मुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.