वीजवापर मोजण्यासाठी महावितरणची आधुनिक यंत्रणा; दोन भागांत प्रायोगिक प्रकल्प
मीटर मापनास होत असलेल्या उशिरामुळे ग्राहकांना वेळेवर देयके मिळत नसल्याच्या तक्रारी ठाण्यात नव्या नाहीत. देयक भरण्याची तारीख अगदी तोंडावर आली असताना ऐनवेळी देयक हाती पडते आणि मग ग्राहकांची तारांबळ उडते. हे प्रकार यापुढे टाळले जावेत यासाठी महावितरणनने ‘डेटा कॅप्चरींग युनिट’ (माहिती गोळा करणारा संच) ही नवी यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून एकाचवेळी किमान दोनशे मीटरचे मापन करता येणार आहे. यामुळे मानवी मीटर मापन पद्धतीमुळे वेळेचा होणारा अपव्यय टाळता येऊ शकणार आहे.
महावितरणच्या ठाणे नागरी मंडळांतर्गत येणाऱ्या शहरांतील काही भागांत इलेक्ट्रॉनिक्स तर काही भागांत साधे मीटर बसवण्यात आले आहेत. इलेक्ट्रॉनिक मीटरचे मापन ‘आरएफआयडी रीडर’च्या माध्यमातून केले जाते. या यंत्रणेमुळे २५ ते ३० मीटर अंतरावरील मीटरचे मापन होत असते. यासाठी कर्मचाऱ्यांना ही यंत्रणा घेऊन सोसायटय़ा तसेच विविध परिसरात जावे लागते. दुसऱ्या मानवीय पद्धतीत साध्या मीटरच्या मोजणीसाठी कर्मचाऱ्यांना घरोघरी जावे लागते. तिथल्या मीटरचे फोटो किंवा रींडिंगची नोंद घ्यावी लागते. या दोन पद्धतींमुळे विद्युत देयके तयार
करण्यास विलंब होतो. तसेच मानवी पद्धतीने केलेल्या मीटर मापनातील देयकांमध्ये अनेक चुका असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येतात. या पाश्र्वभूमीवर महावितरणने डेटा कॅप्चरिंग युनिट (डीसीयू) ही यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. रेडीओ फ्रिक्व्हेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी)च्या धर्तीवर या यंत्रणेचे कामकाज चालणार आहे. या यंत्रणेमुळे एकाच वेळी सुमारे दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरील मीटरचे मापन करणे शक्य होणार आहे. पहिल्या टप्प्यात मुलुंड परिसरातील नीलमनगर आणि ठाण्यातील गडकरी रंगायतन परिसरात प्रयोगिक तत्त्वावर ही यंत्रणा राबवली जाणार आहे.