वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांचा दावा

ठाणे : ठाणेपासून बदलापूपर्यंतच्या शहरांमध्ये वाहतूक नियमांविषयी करण्यात आलेली जनजागृती आणि या नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी घेतलेली दक्षता यामुळे २०१८च्या तुलनेत गेल्या वर्षी, २०१९ मध्ये अपघातांच्या संख्येत घट झाल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने अपघाताच्या प्रमाणात दरवर्षी किमान दहा टक्के घट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, ठाणे वाहतूक पोलिसांच्या हद्दीतील अपघातांचे प्रमाण १९ टक्क्यांनी घटल्याबद्दल काळे यांनी समाधान व्यक्त केले.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेला ‘३१ व्या रस्ते सुरक्षा अभियान २०२०’ हा कार्यक्रम पार पडला. त्या वेळी काळे यांनी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. देशभरात अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दरवर्षी अपघातात १० टक्के घट करण्याच्या सूचना सरकारला दिल्या होत्या. त्यानुसार ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी अपघातांच्या संख्येत घट करण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले होते. तसेच विविध शाळा आणि महाविद्यालयामध्ये जनजागृती केली होती. या कार्यक्रमांमुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी माहिती मिळत आहे. त्यामुळे ठाणे शहर आयुक्तालयातील जखमी आणि मृतांच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा १९ टक्क्यांची घट झाली. राज्यातील ११ आयुक्तालयांमध्ये ठाणे पोलिसांनीच दहा टक्क्यांपेक्षा जास्त अपघातांवर नियंत्रण आणण्यात यश मिळवले, असे ते म्हणाले.       ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथील शहरी भाग येतो. गेल्या दोन वर्षांमध्ये या भागात अपघाताचे प्रमाण कायम आहे. त्यामुळे या अपघातांचे प्रमाण कमी करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

२०१८ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत २४० जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला होता, तर २०१९ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत हे २१७ जणांनी जीव गमावला.

मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातातील मृतांची संख्या ३२ इतकी घट झाली. गंभीर जखमींचा आकडाही मोठा आहे. २०१८ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत ६२१ जण जखमी झाले, तर २०१९ मध्ये याच कालावधीत ४९३ जण गंभीर जखमी झाले. हे प्रमाण २०१९ मध्ये १२८ इतके कमी झाले.

अपघातात मृत्यू होणे ही फार वाईट घटना आहे. वाहने चालविताना चालकाने व्यवस्थित वाहन चालविले, तर नक्कीच अपघाताचे प्रमाण कमी होईल. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून ठाणे पोलिसांकडून जनजागृती सुरू आहे. २०१९ मध्ये आम्ही १० टक्के अपघातामध्ये घट करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कारही मिळालेला आहे. – विवेक फणसळकर, आयुक्त, ठाणे शहर पोलीस