सावरकर नगर, लोकमान्य नगर परिसरासाठी महापालिकेची योजना

ठाणे : मध्यमवर्गी मराठीभाषकांचे बाहुल्य असलेल्या सावरकर नगर, लोकमान्य नगर या दाटीवाटीच्या परिसरातील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली आहे. नव्या वर्षांत पालिका या परिसरातील रस्ते रुंदीकरणाची कामे हाती घेणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या विकास आराखडय़ातील लक्ष्मी पार्क फेज एक ते लोकमान्यनगर बस आगारापर्यंत ३० मीटर रुंदीचा रस्ता केला जाणार आहे.  रस्ते रुंदीकरणामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

ठाणे महापालिकेने गेल्या काही वर्षांत शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण केले आहे. कॅडबरी जंक्शन ते पोखरण रस्त्यांचे रुंदीकरणामुळे या भागातून नियमित प्रवास करणे काही प्रमाणात सुसह्य झाले असले तरी वर्तकनगर तसेच लगतच असलेल्या सावरकर नगर, लोकमान्य नगर, यशोधन नगर आणि कोरस मार्गावरील कोंडी मात्र अजूनही कायम आहे. या सर्वच रस्त्यांवर गेल्या काही वर्षांत वाहनांचा भार वाढला असून त्या तुलनेत हे सर्वच रस्ते अपुरे पडू लागले आहेत. या रस्त्याच्या दुतर्फा इमारती तसेच म्हाडाच्या बैठय़ा वसाहती असून यामुळे या रस्त्यांच्या रुंदीकरणासही फारसा वाव राहिलेला नाही. याच मार्गावर लोकमान्यनगर आगार आणि ठाणे स्थानकाच्या दिशेने टीएमटी बसची वाहतूक सुरू असते. तसेच या ठिकाणी पुरेशा वाहनतळाची सुविधा नसल्यामुळे नागरिक रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करतात. वाहन संख्येच्या तुलनेत आधीच रस्ता अपुरा पडत असतानाच त्यात रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांची भर पडते. यामुळे या सर्वच मार्गावर गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्याचा फटका नोकरदार वर्गाला बसतो. तसेच दुपारच्या वेळेत शाळेच्या बसगाडय़ा एकाच वेळी रस्त्यावर येत असून यामुळेही दुपारच्या वेळेतही या ठिकाणी कोंडी होते.

या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आता या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ठोस पावले उचलली असून त्यासाठी विकास आराखडय़ातील लक्ष्मी पार्क फेज एक ते लोकमान्य नगर बस आगापर्यंत ३० मीटरच्या रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मान्य करण्यात आला आहे. लक्ष्मी पार्क फेज एक ते लोकमान्य नगर बस आगापर्यंत ६५० मीटर लांबीचा आणि ४० मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. मंजूर प्रस्तावानुसार या कामासाठी ८ कोटी ३६ लाख रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे.

प्रवासाचा वेळ वाचणार

वागळे इस्टेट भागातील इंदिरानगर येथून शास्त्रीनगर किंवा कॅडबरी चौकाच्या दिशेने जाण्यासाठी नागरिकांना सावरकर नगर, यशोधन नगर, कोरस रोड, लक्ष्मी पार्क मार्गे जावे लागते. मात्र, हे रस्ते अरुंद असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. विकास आराखडय़ातील लक्ष्मी पार्क फेज एक ते लोकमान्य नगर बस आगापर्यंत ३० मीटरच्या रस्ता तयार केला तर वागळे इस्टेट भागातील इंदिरा नगर येथून लोकमान्य नगर मार्गे थेट शास्त्री नगर किंवा पोखरण रस्ता क्रमांक एकच्या दिशेने वाहने जाऊ शकतील. तसेच जवळचा रस्ता असल्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचेल. याशिवाय, सावरकर नगर, यशोधन नगर, कोरस रोड, लक्ष्मी पार्क या मार्गावरील वाहनांचा भार कमी होऊन येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल, असा दावा प्रशासनाने केला आहे.