लोकमान्यनगर, सावरकरनगर, वागळे इस्टेटमधील रस्त्यांचे रुंदीकरण; आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यानंतर निर्णय

जुन्या ठाण्यापासून लांब असल्याने नेहमीच सुविधांपासून उपेक्षित राहिलेल्या लोकमान्यनगर, सावरकरनगर आणि वागळे इस्टेट परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या भागाची पाहणी केली. हा संपूर्ण परिसर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी लवकरच विशेष आराखडा तयार करण्याचे या दौऱ्यादरम्यान निश्चित करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत अरुंद रस्त्यांमुळे होणाऱ्या कोंडीला तोंड देत मार्गक्रमण करणाऱ्या येथील नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

वर्तकनगर तसेच घोडबंदर परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण तसेच बांधणी सुरू असताना लोकमान्यनगर, सावरकरनगर तसेच वागळे इस्टेट भागाकडे महापालिकेने पाठ फिरविल्याचे चित्र सातत्याने पुढे येत होते. पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या नितीन कंपनी चौक ते कामगार रुग्णालयापर्यंतच्या रस्त्यावर दररोज मोठी वाहन कोंडी होत असून गेल्या तीन वर्षांत यासाठी महापालिकेकडून फारसे काही होत नसल्याची टीका नगरसेवकांकडून सुरू होती. त्यामुळे आयुक्तांचा मंगळवारचा दौर यादृष्टीने महत्त्वाचा ठरला. या दौऱ्यात सावरकरनगर, लोकमान्यनगर भागात रस्ते रुंदीकरण करताना वागळे इस्टेट भागातील रस्ता क्रमांक १६, २२, ३३ या रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले. वागळे इस्टेट रस्ता क्रमांक १६ येथील ट्रक टर्मिनल एमआयडीसीच्या भूखंड क्रमांक सात येथे स्थलांतरित करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याठिकाणी आवश्यक ती भरणी करून तत्काळ ट्रकची पार्किंग त्या ठिकाणी व्हावी अशा सूचना यावेळी जयस्वाल यांनी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांना दिल्या.

आयुक्तांच्या सूचना

  • वागळे इस्टेट परिसरातील १६ झेड रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी येथे तत्काळ सर्वेक्षण करावे. तसेच या रस्त्यापासून अंबिकानगरकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या चौकांची दुरुस्ती करावी.
  • या रस्त्याला जोडून वन खात्याच्या जमिनीवर असलेल्या झोपडय़ा निष्कासित करून हा रस्ता सावरकरनगर नाल्यापर्यंत रुंद करण्यासाठी सर्वेक्षण करा.
  • वागळे इस्टेट भागातील रस्ता क्रमांक २२चे रुंदीकरण करून त्याची रुंदी ४० मीटर करावी.
  • लोकमान्यनगर डेपो जंक्शन येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून हा रस्ताही ४० मीटर इतका रुंद करा. डेपोलगतची अतिक्रमणे हटवून बाधित घरांतील कुटुंबांचे पुनर्वसन करावे.