ठाणे स्थानक परिसरातील सॅटिस पुलावरील छताच्या उभारणीकरिता टीएमटी बस थांब्यांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले असून या थांब्यावरील बसगाडय़ा पश्चिमेतील सॅटिस पुलाखालून आणि कोपरी स्थानकातून सोडण्यात येत आहे. या बदलांमुळे सोमवारी प्रवाशांची तारंबळ उडाली आणि बसगाडय़ांचे थांबे शोधण्यासाठी त्यांची धावपळ झाल्याचे दिसून आले.

सॅटिसवर टीएमटीच्या बसगाडय़ांसाठी थांबे उभारण्यात आले असून या थांब्यावर उभ्या राहणाऱ्या प्रवाशांचे ऊन आणि पावसापासून संरक्षण व्हावे, याकरिता महापालिकेने सॅटिसवर छत उभारणीचा निर्णय घेतला. या कामाकरिता आवश्यक त्या मंजुरी मिळाल्याने महापालिकेने प्रत्यक्षात छत उभारणीचे काम सुरू केले आहे. छत उभारणीकरिता वर्तुळाकार लोखंडी कडा उभारण्यात येत आहे. या कामांमुळे वाहतुकीस अडथळा तसेच अपघात होऊ नये, याची खबरदारी म्हणून महापालिकेने सॅटिसवरील बस थांब्यांचे तात्पुरते स्थलांतर केले आहे. मात्र, या कामाकरिता करण्यात आलेला बदलांमुळे बस थांबे शोधण्याकरिता प्रवाशांची सोमवारी धावपळ झाल्याचे दिसून आले. या बदलांविषयी परिवहन प्रशासनाने फारशी जनजागृती केली नसल्याने कोणत्या बसगाडय़ा कुठून सुटतात, याविषयी प्रवासी अनभिज्ञ होते. त्यामुळे बस थांबे शोधताना त्यांचे प्रचंड हाल झाले.

बस थांब्यांचे बदल
* लोकमान्यनगर, किसननगर, श्रीनगर, गुरूकुल सोसायटी, वागळे आगार, काजूवाडी, लोकमान्यनगर (नितीन कंपनी, इंदीरानगर मार्गे), कोकणीपाडा (पोखरण रोड. २), या मार्गावर धावणाऱ्या बस आता सॅटिस वाहतूक नियंत्रण चौकी येथून सुटणार आहेत.
* शास्त्रीनगर, शिवाईनगर, उपवन, भीमनगर, येऊर आणि लक्ष्मी पार्क या मार्गावर धावणाऱ्या बस ठाणे पूर्व भागातून सुटणार आहेत.
* माजिवडा, बाळकुम (दादलानी पार्क), कोलशेत, मनोरमानगर, ढोकाळीनाका, एव्हरेस्ट वर्ल्ड या मार्गावरील बसचा थांबा चेंदणी कोळीवाडा येथे असणार आहे.
* वृंदावन सोसायटी, ऋतूपार्क, राबोडी (कुरेशी चौक), कळवा, खारेगाव, सह्याद्री सोसायटी, पारसिकनगर (रेतीबंदर सर्कल), रघुकूल सोसायटी, राबोडी, पंचगंगा, अणजूर-अलीमघर, पवारनगर, तुळशीधाम, वाघबीळ, पातलीपाडा, आझादनगर, ब्रह्मांड-धर्माचा पाडा, कासारवडवली, टिकूजीनीवाडी, मानपाडा, गायमुख, ओवळा, मिरारोड या मार्गावरील बस सॅटिसवरील टोव्हिंग व्हॅनसाठी असलेल्या मोकळ्या जागा येथून सुटणार आहेत.