किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : ठाणे आणि आसपासच्या महामार्गावर अवजड वाहनांच्या बेकायदा प्रवेशामुळे होणारी वाहतूक कोंडी टळावी यासाठी वाहतूक पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्रवेशबंदीच्या वेळेत ही अवजड वाहने उभी करण्यासाठी ट्रक टर्मिनस उपलब्ध नाही. परिणामी ही वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी करण्यात येत असून त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत आहे.

ठाण्यात अवजड वाहनांना ठरावीक वेळेत प्रवेश करण्यास परवानगी आहे. असे असताना नवी मुंबई आणि मीरा- भाईंदर- वसई- विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून या वेळेचे बंधन न पाळता ठाण्याच्या दिशेने अवजड वाहने सुटत आहेत. या वाहनांना उभे करण्यास वाहतूक पोलिसांना ट्रक टर्मिनस उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे नवी मुंबई, मीरा भाईंदर येथून येणाऱ्या वाहने शिळफाटा तसेच गायमुख परिसरातील रस्त्याकडेला उभी केली जात आहेत. त्याचा परिणाम आता शिळफाटा आणि घोडबंदर मार्गावर होत असून पुन्हा एकदा वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना नवी मुंबई-मुंबईहून कल्याण किंवा बोरिवलीहून ठाणे गाठण्यासाठी अर्धा ते पाऊण तास अधिक लागत आहे.

वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत ठाणे आयुक्तालय क्षेत्रात प्रवेश आहे. त्याव्यतिरिक्त इतर वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे. त्यानंतरही नवी मुंबई आणि मीरा- भाईंदर- वसई- विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून मोठय़ा प्रमाणात अवजड वाहने ठाण्याच्या दिशेने सोडण्यात येतात. जेएनपीटी, नवी मुंबईहून सुटणाऱ्या वाहनांमुळे कल्याण शिळफाटामार्गे, तर मीरा भाईंदर येथून येणारी वाहने घोडबंदर मार्गावरून येत असतात. त्याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होत असतो. करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवासास बंदी आहे. त्यामुळे ठाणे आणि आसपासच्या नगरांमधील हजारो नागरिकांना त्यांच्या खासगी वाहनाने कल्याण-शिळफाटामार्गे मुंबई आणि नवी मुंबई गाठावी लागत आहे. याच मार्गावर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या तक्रारीनंतर आता ठाणे वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांच्या वेळेसंदर्भात काढलेल्या अधिसूचनेचे पालन करण्यात येऊ लागले आहे. त्यामुळे सध्या ठरावीक वेळेव्यतिरिक्त येणाऱ्या अवजड वाहने गायमुख आणि शिळफाटा येथे थांबविली जात आहेत.

या वाहनांचे प्रमाण अधिक असल्याने रस्त्याकडेला वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे रस्त्याचा बराचसा भाग अडवून पुन्हा वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. त्यातच रस्ता रुंदीकरणाचे कामही सुरू असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर होते. या अवजड वाहनांना नवी मुंबईत किंवा मिरा भाईंदर क्षेत्रातच रोखल्यास वाहतूक कोंडी होणार नाही असा सूर वाहनचालकांकडून उमटू लागला आहे. तसेच ठाणे महापालिकेनेही गायमुख, शिळफाटा किंवा कळवा परिसरात काही वेळासाठी ट्रक टर्मिनस सुरू केल्यास हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उरण जेएनपीटी येथून मोठय़ा प्रमाणात अवजड वाहने ठाण्याच्या दिशेने येत असतात. तेथून वाहने सुटल्यास ठाणे वाहतूक पोलिसांना ती वाहने रस्त्याकडेला उभी ठेवावी लागत असल्याचे चित्र आहे. तसेच रस्ता रुंदीकरणामुळेही वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. लवकरच ट्रक टर्मिनस संदर्भात काही उपाययोजना करता येतील का यासंदर्भात वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनासोबत बैठक ठेवून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत.
– प्रमोद पाटील, आमदार