वसई खाडीपुलाच्या दुरुस्तीसाठी परीक्षण अहवालाची प्रतीक्षा; तोपर्यंत ठाणे, शीळफाटा वाहतूक कोंडीने ग्रस्त

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई खाडीवरील जुना वर्सोवा पूल दुरुस्तीसाठी १५ सप्टेंबरपासून बंद करण्यात आला असला तरी या पुलाच्या दुरुस्तीच्या कामास अद्याप सुरुवात झालेली नाही. या पुलाच्या दुरुस्तीसाठी सल्लागार कंपन्यांकडून मागविण्यात आलेला अहवाल अद्याप महामार्ग प्राधिकरणाला प्राप्त झालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या कामाच्या दुरुस्तीची पुढील रूपरेषा स्पष्ट होऊन हे काम सुरू होईल. अद्याप या पुलाच्या परीक्षणाचे काम सुरू असल्यामुळे हा अहवाल येण्यास विलंब लागत आहे. याचा मोठा फटका ठाणे, मुंब्रा, शीळफाटा या परिसरातील वाहतुकीला बसत असून दररोज दिवसभर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पुलाची दुरुस्ती सुरू होण्यास विलंब झाल्यास या कोंडीचा कालावधीही वाढत जाण्याची भीती आहे.

मुंबईतून तसेच ठाण्यातून गुजरातकडे जाणारी वाहने वर्सोवा पुलाचा मोठय़ा प्रमाणावर वापर करीत असून १९७० साली बांधलेला हा पूल धोकादायक बनला आहे. २०१३ साली या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र महाड दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या पुलाची पुनर्तपासणी केली असता गर्डरला भेगा पडल्याचे दिसून आले होते. कमी क्षमतेच्या पुलावरून अवजड वाहनांना प्रवेश दिल्यामुळे या पुलाला धोका निर्माण झाला असून त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली. या पुलाचे सर्वेक्षण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिल्लीतील डॉ. रैना यांची नियुक्ती केली, तर आरआयबीकडून लंडनच्या रॉनबॉल कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

या सल्लागारांकडून सर्वेक्षण करण्यात आले असून या पुलाच्या भेगांमध्ये काचा बसवण्यात आल्या आहेत. त्याची होणारी हानी नोंदवली जात आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाकडून या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

१५ सप्टेंबरपासून या पुलावरून वाहतुकीस बंदी घातल्यामुळे ठाण्यात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवडय़ामध्ये ठाण्यात अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा त्रास निर्माण झाला. त्यामुळे या पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची रहिवाशांनी मागणी केली आहे. मात्र अहवालाअभावी हे काम अडकून पडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या या पुलावरून छोटय़ा वाहनांना ताशी २० किमी वेगमर्यादा घालून वाहतूक सुरू ठेवण्यात आल्याची माहिती प्राधिकरणातील सूत्रांनी दिली.

दोन दिवसांत चित्र स्पष्ट?

एक ते दोन दिवसांमध्ये सल्लागारांचा अहवाल महामार्ग प्राधिकरणाकडे प्राप्त होणार असून त्यानंतर पुलाच्या दुरुस्तीची रूपरेषा स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.  तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्तीचे काम सुरू होईल. या दुरुस्तीसाठी लागणारी सगळी यंत्रणा या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. खाडीमध्ये आवश्यक पाया तयार करून त्यावरून पुलाच्या दुरुस्तीचे काम केले जाईल. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर वाहतूक पूर्ण बंद करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अहवालानंतर प्रत्यक्ष काम सुरू होईल..

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीच्या दृष्टीने आवश्यक वाहतूक बदलाचे आदेश देण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम प्राधिकरणाने सुरू केले असले तरी सल्लागारांच्या अहवालानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. सध्या येथील अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून दुरुस्तीनंतरच येथून इतर वाहनांना सोडण्यात येईल. जुन्या पुलासाठी बारीक तारांची जोडणी केलेली असून नव्या पुलांसाठी जाड तारा वापरल्या जातात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या तांत्रिक बाबी लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण काम करीत आहे.

– डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, ठाणे