News Flash

शास्त्रीय संगीताची सुरेल मैफल

सदाशिव अकादमी ऑफ म्युझिक या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शास्त्रीय संगीताची सुरेल मैफल

शास्त्रीय संगीत म्हणजे सूर आणि लयीचा मिलाप. मनाच्या कॅनव्हासवर उमटणाऱ्या अमूर्त भावनांना अभिव्यक्त करण्यासाठी शास्त्रीय संगीत हे उत्तम साधन आहे. रसिक असणाऱ्या डोंबिवलीकरांच्या मनाला तर शास्त्रीय संगीतामुळे नेहमीच उभारी मिळते. समीर अभ्यंकर यांनी शनिवारी सायंकाळी टिळकनगर शाळेच्या सभागृहात सादर केलेल्या शास्त्रीय संगीताची मैफल विलक्षण रंगली. श्रोत्यांचे कान त्यामुळे तृप्त झाले. सदाशिव अकादमी ऑफ म्युझिक या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शुद्ध कल्याण आणि बसंती रागात गायलेल्या सुरांनी अभ्यंकर यांनी रसिकांना जणू रागाची पुन्हा नव्याने ओळख करून दिली. सुरातून आणि गळ्यातून राग सादर करताना स्वत: तल्लीन झालेले समीर अभ्यंकर वादकांनी वाजवलेल्या वाद्यांनाही अधूनमधून दाद देत होते. इतकेच नव्हे तर रसिकांनी केलेल्या कौतुकाने भारावून न जाता गाण्यातून जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे त्यांच्या नजरेतून ते रसिकांना शिकवत होते. ‘क्या बात है’ असे म्हणत रसिकही गाण्यातून मनोरंजनाचा आस्वाद घेत होते. मोगऱ्याच्या फुलावर नेहमीच भ्रमराचे अस्तित्व असते. अगदी त्याचप्रमाणे उत्तम कलाकाराची कला बघण्यासाठी रसिकांनी त्याचा आवतीभोवती नेहमीच गर्दी केलेली दिसते. असेच चित्र पेंढरकर सभागृहात दिसत होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यावेळी समीर अभ्यंकर यांनी शुद्ध कल्याण रागात बडा ख्यालमधील ‘तुम बीन कौन’ हे गाणे सादर केले. त्यानंतर ‘रस भिनी भिनी’ हे गाणे सादर झाल्यानंतर त्यांनी बसंत रागातील पशुपती गिराजावर शंकर अर्धागिनी हे गाणे सादर केले.

कार्यक्रमाच्या शेवटी तुलसीदास यांचे ‘ठुमक चलत रामचंद्र’ हे भजन त्यांनी सादर केले आणि रसिक भक्तिरसात न्हाऊन गेले. यावेळी अभ्यंकरांना तबल्यावर साथ देणाऱ्या विनायक नाईक आणि संवादिनीवर साथ देणाऱ्या मकरंद कुंडले यांच्या वादनावरही रसिकांनी वेळोवेळी दाद दिली. तंबोऱ्यावर मंजिरी देसाई आणि मधुरा जाधव यांनी चांगली साथ दिली. अस्सल सुरांच्या बरसात झालेल्या या मैफलीने डोंबिवलीकर तृप्त झाले.

शहनाईचे सूर दरवळले!

परंपरेनुसार शुभसंकेत देणारे शहनाईचे सूर आजकाल फक्त मंगलकार्यातच जास्त ऐकायला मिळतात. मात्र रविवारी सायंकाळी सहयोग मंदिर येथे हे सूर आग्रा घरणाच्या गायकीबरोबर ठाणेकरांना कुठल्याही मंगलकार्याव्यतिरिक्त ऐकू आले. प्रेम दिनाच्या निमित्त संगीतप्रेमी मंडळाने आपले गाण्यावरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी तसेच आग्रा घराण्याचे गायक दातीर गुरूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या कार्यक्रमाचा आस्वाद संगीतप्रेमी रसिकांनी घेतला.

ठाण्यातील रसिकांना वाद्य, शास्त्रीय संगीत ऐकायला नेहमीच आवडते. पंडित जी.जी जोशी यांनी सादर केलेल्या आग्रा घराण्याच्या गायकीलाही ठाणेकरांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. निवृत्तीनंतर आपली कला नव्याने जोपासणारे जोशी यांनी शुद्ध कल्याण रागापासून बिहार, यूपीमध्ये गाण्यात येणाऱ्या लोकसंगीताचे त्यांच्या शिष्यांसह सादरीकरण केले. यावेळी शहनाईवादक शैलेश भागवत यांनी त्यांच्या गाण्याला शहनाईच्या सुरांची साथ देऊन चार चांद लावले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तर पंडित कालिनाथ मिश्रा यांनी तबला वाजवल्यानंतर सभागृहात स्वररागिणी अवतरल्याचा भास रसिकांना झाला. त्यानंतर कंठ गायन आणि वाद्य गायन यांची जुगलबंदीही तितकीच रंगली होती. यावेळी रसिकाच्या हातांनीही हलकाच ठेका धरला होता. क्या बात है म्हणत दाद देऊन तालाच्या प्रत्येक मात्रेवर रसिकांनी टाळ्यांची दाद दिली. गाण्याची सरुवात मुलतानी रागाने झाली. या रागात कबन देस गई  आणि आज मन मोरा बस गई रे ही गाणी पंडित जोशी यांनी त्यांच्या शिष्या आशिता कुलकर्णी, रोहिणी रोहम, तपस्वी विधाटे यांच्यासह सादर केली. त्यानंतर यूपी-बिहारचे चैती-दीपचंदी या लोकसंगीतातील चैत मास बोलले हे गाणे सादर केले. त्यानंतर शुद्ध कल्याण रागातील आलीरी मोहे, सुनी सुनी जानी रे ही गाणी सादर झाली.

जयजयवंती राग, पिलू दादरा व होरी हे लोकसंगीताचे प्रकारही सादर करण्यात आले. गाण्याला त्याच्या विविध रागांना चिरतरुण बनविण्यासाठी संवादिनीची साथ नेहमीच आल्हाददायक आणि हवीहवीशी असते. ही साथ संवादिनीवादक प्रकाश चिटणीस यांनी दिली. गाण्याचा आत्मा असणाऱ्या तंबोऱ्याची साथ सिद्धी पटवर्धन हिने दिली. कार्यक्रमाअंती तुलसीदासाचे भज, मन राम चरण सुखदायी हे भजन कलाकारांनी सादर केले. प्रत्येक कलाकार सहकलाकाराला आवर्जून दाद देत होता. त्यामुळे सभागृहात प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांना त्यांच्या या कलेच्या खेळाने खिळवून ठेवले होते. मीना राजे यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी शहनाईवादक शैलेश भागवत यांनी आपले अमेरिकेतही वादनाचे १९ कार्यक्रम झाल्याचे आवर्जून नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2016 3:05 am

Web Title: thane singing festivals
टॅग : Thane
Next Stories
1 मीरा-भाईंदरमध्ये नव्या बांधकामांना मनाई
2 वसई, विरारमध्ये आज, उद्या पाणी नाही
3 माघी गणेशाला भावपूर्ण निरोप!
Just Now!
X