ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सॅटिस पुलावर छतउभारणीचे काम ऑगस्टअखेर पूर्ण होईल, अशी हमी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली असली तरी हे काम येत्या चार दिवसांत संपण्याची चिन्हे नाहीत. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेले सॅटिसवरील छतउभारणीचे काम शेवटच्या टप्प्यात असले तरी अद्याप येथे २५ टक्के कामे शिल्लक आहेत. त्यामुळे काम पूर्ण करण्यासाठी अभियांत्रिकी विभागाने १५ सप्टेंबरची मुदत दिली आहे. त्यामुळे गणरायाचे आगमन होईपर्यंत तरी सॅटिसवरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांवरील संकट टळण्याची शक्यता नाही.सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येणारे भारतातील सर्वात मोठे छत असा ठाणे स्थानकातील सॅटिसच्या छताचा उल्लेख केला जात आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये या छताच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. पावसाळ्यापूर्वी म्हणजेच जून २०१५ पर्यंत हे काम संपणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ऑगस्टच्या अखेरीस हे काम पूर्ण केले जाईल, असे ठरले. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सॅटिसची पाहणी करून ऑगस्टअखेपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र अद्याप २५ टक्के कामे शिल्लक आहेत. तरीही छतावर विशिष्ट प्रकारचे कापड बसवण्याचे काम येत्या चार-पाच दिवसांत पूर्ण करण्याचा दावा अभियंत्यांनी केला आहे. असे असले तरी या कामांसाठी आता १५ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. या संदर्भात शहर अभियंता रतन अवसरमोल यांच्याशी संपर्क साधला असता, छतउभारणीचे काम ८५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला. त्याच वेळी सप्टेंबरअखेपर्यंत कामे पूर्ण होतील, असे ते म्हणाले.