डोंबिवली – दुसऱ्या देशाची संस्कृती, राहणीमान याचे आकर्षण सर्वानाच असते. जगातील विविध देशांची माहिती शालेय विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना व्हावी या उद्देशाने ‘विविसु डेहरा’ या संस्थेच्या वतीने ‘जडला पर्यटनाचा छंद, गप्पा मारू स्वच्छंद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या देशांची संस्कृती, राहणीमान यासोबतच तेथील शिक्षणपद्धती, वाहतूक व्यवस्था, आरोग्यसेवा, व्यवसायाच्या संधी, भौगोलिक तसेच ऐतिहासिक महत्त्व, खानपान सुविधा व तेथील पर्यटनस्थळे आदी माहिती दिली जाणार आहे. त्या देशात अधिक काळ राहिलेले नागरिक तुमच्याशी या गप्पा मारणार आहेत. रविवार, १६ ऑगस्ट रोजी सिंगापूर या देशाची माहिती सांगण्यात येणार असून सागर मुश्रीफ हे मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ६ वाजता वासन आय केअर हॉस्पिटल, दुसरा मजला, रेमंड शोरूमच्या वर, मानपाडा रोड, डोंबिवली (पू.) येथे हा कार्यक्रम होणार आहे.
कधी– रविवार, १६ ऑगस्ट
कुठे– वासन आय केअर हॉस्पिटल, दुसरा मजला, रेमंड शोरूमच्या वर, गावदेवी मंदिराजवळ, मानपाडा रोड, डोंबिवली (पू.)

pradarshanकैलास मानसरोवर छायाचित्रांचे प्रदर्शन
फोटो सर्कल सोसायटीच्या वतीने छायाचित्रकार उत्तम नेवाळकर यांनी कैलास मानसरोवर येथे काढलेल्या छायाचित्रांच्या स्लाइड शोचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता ठाणे कलाभवन, भातसा गॅलरी, पहिला मजला, कापुरबावडी चेक नाका, बिग बाजारजवळ, ठाणे (प.) येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी संपर्क -९७०२५५२२३३ किंवा ९८१९९७७९०८. प्रवेश विनामूल्य आहे.

कधी– रविवार, १७ मे, सायंकाळी ५.३०
कुठे– ठाणे कलाभवन, भातसा गॅलरी, पहिला मजला, कापुरबावडी, चेक नाका, बिग बाजारजवळ, ठाणे (प.)

 

अनिल अवचट यांना ऐकण्याची संधी
ठाण्यातील विद्यादान सहाय्यक मंडळ या गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणाऱ्या संस्थेचा सातवा वर्धापन दिन शनिवार, १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता  सहयोग मंदिर, घंटाळी, नौपाडा, ठाणे (प) येथे साजरा होणार आहे. ज्येष्ठ लेखक व समाजसेवक डॉ. अनिल अवचट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कधी– शनिवार, १५ ऑगस्ट, दुपारी ३.३० वाजता
कुठे– सहयोग मंदिर, पहिला मजला, घंटाळी, ठाणे (प)

पर्राठा..
नाश्त्याला काय करायचं? या गृहिणींना नेहमी पडणाऱ्या प्रश्नावर कोरम मॉलने एक तोडगा काढला आहे. ‘वुमन्स् ऑन वेन्सडे’ या उपक्रमाअंतर्गत खास महिलांसाठी ‘देसी तडका’ या पराठे बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कश्मिरी नान, कुलछा, लछ्छेदार पराठा, थाळी पीठ आणि स्टफ पराठा असे विविध प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. बुधवारी दुपारी ३ ते रात्री ८ यावेळेत कोरम मॉल, मंगल पांडे रोड, कॅडबरी जंक्शन, ठाणे (प.) येथे ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
कधी– बुधवार, १९ ऑगस्ट
कुठे– कोरम मॉल, मंगल पांडे रोड, कॅडबरी जंक्शन, ठाणे (प.)

 

‘तीन फुल एक डाऊटफुल’
‘हसाल तर जगाल’ ही उक्ती सर्वश्रुत आहे. हसणे आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. दूरचित्रवाणी, इंटरनेट, चित्रपट, नाटय़ या व अशा विविध माध्यमांद्वारे आपण मनोरंजनपर कार्यक्रम पाहत असतो. नाटक हे यांपैकी मनोरंजनाचे गणले जाणारे एक प्रभावी माध्यम. कल्याणातील काही कलाकार एकत्र येऊन त्यांनी ‘तीन फुल एक डाऊटफुल’ या विनोदी नाटकाची निर्मिती केली. येत्या रविवारी कल्याण परिसरातील रसिकांना हे नाटक पाहण्याची संधी आहे. संकेत सुभेदार, केतकी गोखले, मंदार अंतुरकर, दिप्ती गवंडे, ऋतुराज फडके आदी कलाकार या नाटकातून आपली कला सादर करणार आहेत.
कधी : रविवार, १६ ऑगस्ट, वेळ : सकाळी ११ वाजता
कुठे : आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण (प.)

जगभरातील चलनी नोटांचे प्रदर्शन
टीजेएसबी बँकेतर्फे जगातील १९३ देशातील चलनी नोटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जगभरातील या चलनी नोटा पाहणे अतिशय रंजक आहे. वेस्ट इंडियन भूखंडातील गियाना देशातील नोटेवर श्रीकृष्ण रंगपंचमी खेळत असल्याचे चित्र आहे. इंडोनेशियातील एका नोटेवर श्री गणेशाचे चित्र आहे. त्याचप्रमाणे भारतात वसाहतींचे राज्य असणाऱ्या पोर्तुगीज, फ्रेंच व ब्रिटिश राजवटीतील दुर्मीळ नोटा या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.

कधी– शनिवार, १५ ऑगस्ट
कुठे– टीजेएसबी बँक, शॉप नं. ९ ते १३, सावंत प्लाझा, बेलवली, बदलापूर(प.)

 

अक्षरसंध्या कट्टय़ावर यंदा टिळक साहित्यावर चर्चा
बदलापुरात सुरू झालेल्या अक्षरसंध्या वाचक कट्टय़ावर लोकांना लोकमान्य स्वातंत्र्यसेनानी म्हणून परिचित असलेल्या बाळ गंगाधर टिळकांची साहित्यिक ही ओळख उलगडण्यात येणार आहे. लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या साहित्यावर चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला वक्ते म्हणून ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ म्हणून डॉ. विश्वास मेहंदळे उपस्थित राहणार आहेत. वाचनप्रेमी वाचकांसाठी सुरू झालेल्या या वाचक कट्टय़ामध्ये काही वाचकांना त्यांची मतेही मांडता येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला शहरातील समस्त वाचकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कुठे? काटदरे मंगल कार्यालय, कुळगाव, बदलापूर (पू.)
कधी? रविवारी, १६ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता.