मुंबई मॅरेथॉनसाठी पात्रता फेरी म्हणून समजली जाणारी तसेच हौशी मॅरेथॉनपटूंसाठी महत्त्वाची असलेली ठाणे १०के ( १० किमी) पावसाळी हौशी मॅरेथॉन स्पर्धा यश शेरलकर याने ३८.०५ मिनिटात पूर्ण केली, तर महिलांच्या गटातील स्पर्धा संयुरी दळवी हिने ५१.०९ मिनिटात पूर्ण केली. पातलीपाडा येथील हिरानंदानी इस्टेट सर्कलपासून सकाळी ६.३० वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष असून एक हजारांहून अधिक स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. चंद्रशेखर कोवलेकर यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखविला. स्थानिक नगरसेवक नरेश मणेरा, मुकेश ठोंबरे, रिदमीक रनिंगचे नागेश शेट्टी तसेच रहिवासी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. रिदमिक रनिंग तसेच रोटरी क्लब ऑफ घोडबंदर यांच्या वतीने या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

१० किलोमीटर अंतराची ही स्पर्धा हिरानंदानी इस्टेट ते ब्रह्मांड, कोलशेत अशी फिरून परत हिरानंदानी सर्कलला समाप्त झाली. विजेत्यांना पदक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेला ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक फेडरेशनची मान्यता मिळाली असून मुंबई मॅरेथॉनसाठी या स्पर्धेची वेळ पात्रता म्हणून ग्राह्य़ धरली जाते. ठाण्याचे महापौर संजय मोरे, खासदार राजन विचारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सकाळी स्पर्धेला सुरुवात होतेवेळी पावसाने हजेरी लावल्याने स्पर्धकांमध्ये उत्साही वातावरण होते. १७ ते ५८ वय वयोगटातील स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता.

महिलांच्या गटात संयुरी दळवी (प्रथम), संहिता अय्यर ( द्वितीय) व डॉ. शलाका भांडारकर ( तृतीय) क्रमांकाचे मानकरी ठरले तर, पुरुष गटात यश शेरलकर याने प्रथम व शिवानंद शेट्टी (द्वितीय) तसेच विशाल लौंगवी ( तृतीय) क्रमांक पटकावला.

कास्पाराव संघ बुद्धिबळ चषकाचे मानकरी

प्रकाश वझे क्रीड प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पंचम रूचा खुल्या सांघिक बुद्धिबळ चषक स्पर्धेत दक्षिण मुंबईच्या कास्पाराव कोचेस संघाने फिरत्या चषकावर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. मुलुंड येथील मुलुंड विद्यामंदिर शाळेत रविवारी ही स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत ५० हून अधिक संघांनी भाग घेतला होता. टोरोन्टो टॅक्टीशियन यांना उपविजेतेपद तर मुंबई मास्टर संघाला तिसरे स्थान मिळाले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुलुंड जिमखान्याचे विश्वस्त मंदार वैद्य यांच्या हस्ते पार पडला.

स्केटिंग स्पर्धेत सॅक्रेड हार्ट शाळा अजिंक्य

राजीव गांधी स्मृती चषक राज्य खुल्या स्केटिंग स्पर्धेत सॅक्रेड हार्ट शाळेने विजेतेपद तर श्री महावीर जय शाळेने उपविजेतेपद पटकावले. युवक काँग्रेसच्या स्केटिंग असोसिएशनतर्फे रविवार १० जुलै रोजी  वरप येथे ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ३५० खेळाडूंनी भाग घेतला होता. स्केटिंगच्या चार विविध प्रकारांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.  स्पर्धेचे उद्घाटन  ब्रिज किशोर दत्त यांच्या उपस्थितीत पार पडले.

विभागीय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन

दुसरी मुंबई विभागीय ज्युनिअर रोलबॉल अजिंक्यपद स्पर्धा १६ जुलै रोजी सेक्रेट हार्ट स्कूल, कल्याण येथे होणार आहे. या स्पर्धेत रायगड, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, व पालघर या पाच जिल्ह्य़ांतील खेळाडू सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेतून  निवडलेला संघ दिनांक २३ ते २४ जुलै दरम्यान नंदुरबार येथे होणाऱ्या ११ व्या ज्युनिअर राज्य रोलबॉल स्पर्धेत मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करेल असे ठाणे जिल्हा सचिव प्रताप पगार यांनी सांगितले. या खेळाचे जन्मगाव पुणे. असा हा अस्सल महाराष्ट्रीय खेळ आता ४६ देश खेळत आहेत.

देश पातळीवर सर्व शासन मान्यता या खेळाला

प्राप्त झाल्या असून आता आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्येही या खेळाचा समावेश होणार आहे. त्यामुळे या खेळाची शासनातर्फे शालेय राज्य स्पर्धा घेत असल्याची माहिती प्रताप पगार यांनी दिली.