अल्फा सायकलिंग क्लबला विजेतेपद
वेलोरेड अ‍ॅम्युचर सायकलिंग आयोजित पहिल्या ठाणे-वैतरणा-ठाणे या १८० किलोमीटर अंतराच्या सायकलिंग शर्यतीत अल्फा सायकलिंग क्लबने बाजी मारली. ओमकार जाधव, मसूद डिजराहझडेह, पवन जावळे, डेसमंड मिरांडा, रितीक नायर आणि राकेश पवारा यांचा समावेश असलेल्या अल्फा सायकलिंग क्लबने ६ तास ६ मिनिटे २० सेंकदांत ही शर्यत पूर्ण करत नवा उच्चांक रचला.ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलजवळ या शर्यतीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. अल्फा सायकलिंग क्लबच्या ओमकार, मसूद, पवन, डेसमंड, रितीक आणि राकेशने ताशी  २८.६८ किलोमीटरचा वेग राखत आपल्या प्रतिस्पध्र्यावर सरशी मिळवली. प्रोस्टर अ संघाने ६ तास १० मिनिटे अशी वेळ नोंदवत दुसरा क्रमांक पटकावला. नाशिक सायकलिंग प्रो संघाने ६ तास २० मिनिटांत ही शर्यत पूर्ण करत तिसरा क्रमांक पटकावला. अल्फाच्या ओमकार जाधवने या यशाचे श्रेय क्रिश कॅप्टन आणि डॉ. भावना जयस्वाल यांना दिले.
अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी खेळाडू सज्ज
नागपूरमध्ये २८ व २९ ऑगस्टला १६ वर्षांखालील वयोगटाच्या राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मैदानात या स्पर्धा होणार असून राज्यभरातून या स्पर्धेला ८५० स्पर्धक हजेरी लावणार आहेत. गेल्या काही महिन्यांत ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या ठाणे संघातील सर्वच वयोगटांतील मुलांनी राज्यस्तरीय स्पर्धामध्ये पदकांची लयलूट केली असून अनेकांची राष्ट्रीय स्पर्धासाठीही निवड झाली आहे. १६ वर्षांखालील वयोगटातील या स्पर्धा खेळण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ाच्या ४१ खेळाडूंचा संघ सज्ज झाला आहे. ठाणे संघातील तनिष्का शेट्टी हिच्याकडून लांब उडी प्रकारात चांगल्या कामगिरीची अपेक्षा करण्यात येत आहे. अशी माहिती ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघाचे सचिव अशोक आहेर यांनी दिली.
कुरोगी, फुमसे स्पर्धाचा समारोप
ठाणे जिल्हास्तरीय कुरोगी व फुमसे स्पर्धाचा समारोप झाला असून बदलापुरात झालेल्या या स्पर्धामधील सुवर्णपदकविजेत्या मुलांची निवड ही नुकतीच राज्यस्तरीय स्पर्धासाठी करण्यात आली. या स्पर्धासाठी ते ठाणे जिल्ह्य़ाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा तायक्वांदो असोसिएशनने बदलापूर येथे घेतलेल्या या स्पर्धेत कनिष्ठ व वरिष्ठ गटातील सर्व प्रकारच्या वजनी गटातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. कराटेसारख्याच या स्पर्धामध्ये जिल्हा असोसिएशनशी निगडित असलेल्या दहा अ‍ॅकॅडमींनी सहभाग घेतला होता. राज्यस्तरीय स्पर्धाचे ठिकाण लवकरच विजेत्यांना कळविण्यात येईल. अशी माहिती ठाणे जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव कौशिक गरवालिया यांनी दिली.
सर्व प्रकारच्या वजनी गटातील सुवर्णपदकविजेते कनिष्ठ गट-मुली
शिप्रा शुक्ला, अनुष्का त्रिपाठी, श्रुतिका जाधव, आकांक्षा चौधरी, कोमल पाखले, क्लॉरिसा लोबो, श्रुती मनोहरन, दीक्षिता पटेल, साक्षी काळे.
कनिष्ठ गट- मुले
बिपिनकुमार सिंग, हर्षिद पटेल, गौरव खन्ना, ओंकार झांबरे, मयूर पाटील, ओंकार साळुंखे, सूरज गरवालिया, श्रीराज नायर, नीलेश शुक्ला
वरिष्ठ गट-मुली
पूनम वानखेडे, कोमल जाधव, मनीषा वानखेडे, मयूरी दांडेकर, सोनम चव्हाण, ऐश्वर्या शिंदे, मनीषा पाटील

वरिष्ठ गट- मुले
संकेत मांढरे, मयूर इंगोले, करण सारंग, हर्ष सदिओरा, प्रसाद अयभाये, सुजित गुंड, प्रमोद कदम, मोहन दिनकर नागपूरमध्ये होणार राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

क्रीडा दिनानिमित्त बदलापुरात सायकल स्पर्धा
मेजर ध्यानचंद या क्रीडा महर्षीच्या २९ ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडा दिनी देशभर क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे व क्रीडा संकुल समिती, अंबरनाथ व गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल आदींच्या संयुक्त विद्यमाने सायकल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी २९ ऑगस्टला या स्पर्धा होणार आहेत. १४ व १७ वर्षांखालील मुले व मुली आणि पुरुष व महिला या गटात ही सायकल स्पर्धा होणार आहे. १४ व १७ वर्षांखालील मुले व पुरुषांसाठी अनुक्रमे २, ५ व १० किमीचे अंतर असणार आहे. तर १४ व १७ वर्षांखालील मुली व महिलांसाठी २, ३ व ५ किमीचे अंतर असणार आहे. या स्पर्धेसाठी २८ ऑगस्टपर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहे. जुना कात्रप पेट्रोलपंप, बदलापूर (पू.) येथून या स्पर्धाना सकाळी ७ वाजता सुरुवात होणार असून सकाळी ९ वाजता विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अशी माहिती तालुका क्रीडा संकुल, अंबरनाथचे केंद्रप्रमुख विलास गायकर यांनी दिली. प्रवेशिकांसाठी संपर्क : ९५६१०७८००८.