19 October 2019

News Flash

ठाणे स्थानकाचा ऐतिहासिक वारशाचा दर्जा केवळ कागदावरच

आशिया खंडातील पहिल्या रेल्वेसेवेला आज १६६ वर्षे पूर्ण

आशिया खंडातील पहिल्या रेल्वेसेवेला आज १६६ वर्षे पूर्ण

आशिया खंडातील पहिल्या रेल्वेसेवेला आज १६६ वर्षे पूर्ण

ठाणे : बोरीबंदर ते ठाणे या आशिया खंडातील पहिल्या रेल्वे सेवेला मंगळवारी १६६ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वेचा वाढदिवस रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात येणार असून रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. एकीकडे वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी जोरदार तयारी सुरू असली तरी ठाणे रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक दर्जा अद्याप मिळाला नसल्याने रेल्वे प्रवासी संघटनांनी सोमवारी नाराजी व्यक्त केली. या मार्गावर धावलेले पहिले रेल्वे इंजिन ठाणे स्थानकात ठेवावे ही मागणीही मान्य झालेली नाही.

१६ एप्रिल १८५३ ला बोरीबंदर ते ठाणे ही आशिया खंडातील पहिली रेल्वे रुळांवर धावली. ३३.८ किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी या रेल्वेला ५७ मिनिटे लागली. या रेल्वे सेवेला १६६ वर्षे पूर्ण झाल्याने ठाणे रेल्वे स्थानकात  मंगळवारी ११ वाजता रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे  केक कापून रेल्वेचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून ठाणे रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रवाशांचा गौरवही करण्यात येणार आहे. असे असले तरीही ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या ठाणे रेल्वे स्थानकाला अद्यापही ऐतिहासिक रेल्वे स्थानकाचा दर्जा प्राप्त झालेला नाही. ज्या रेल्वे स्थानकातून आशिया खंडातील पहिली रेल्वे सेवा धावली. त्या रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक दर्जा का दिला जात नाही, असा सवाल प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे. तसेच ठाणेकरांना रेल्वेचा इतिहास माहिती व्हावा यासाठी पहिल्या रेल्वेचे इंजिन ठाणे रेल्वे स्थानकात आणले जावे यासाठी प्रवासी संघटनेने स्वाक्षरी मोहीमही घेतली होती. लोकप्रतिनिधींनीही हा मुद्दा पुढे करण्यात आला होता. मात्र, अद्यापही रेल्वे प्रशासनाने हे इंजिन ठाणे स्थानकाला दिले नाही. त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनांमध्ये नाराजीचा सूर आहे.

साहेबाची पोर नकली रे..

बिन बैलाची गाडी कशी हाकली रे..

बोरीबंदर ते ठाणे रेल्वे स्थानकाची पहिली रेल्वे सेवा इंग्रजांनी सुरू केली तेव्हा ही गाडी कशी धावत आहे याचा अंदाज भारतीयांना येत नव्हता. त्यावेळी नागरिकांनी ‘साहेबाची पोर नकली रे.. बिन बैलाची गाडी कशी हाकली रे..’ अशा घोषणा दिल्या होत्या, अशी आठवण सांगत प्रवासी संघटनेने पहिल्या रेल्वेसेवेच्या स्मृतींना उजाळा दिला.

ऐतिहासिक रेल्वे स्थानक असूनही रेल्वे ऐतिहासिक दर्जा ठाणे रेल्वे स्थानकाला मिळालेला नाही. त्यामुळे ही बाब अत्यंत खेदाची आहे. ठाणे स्थानकाला रेल्वेचे इंजिन मिळावे. यासाठीही आम्ही अनेक प्रयत्न केले. मात्र, तरीही रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक उत्तरे मिळाली नाही.

– नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना.

First Published on April 16, 2019 2:45 am

Web Title: thane station historical heritage status only on paper