ठाणे स्थानकात नियोजन करताना महापालिकेची कसरत

ठाणे : शहरात रेल्वे मार्गाने दाखल होणाऱ्या परप्रांतीयांच्या शीघ्रजन चाचण्या करताना प्रतिबंध रोखण्याची मोठी मोहीम ठाणे महापालिकेने हाती घेतली असली तरी या चाचण्या करताना स्थानकावर पुरेशा प्रमाणात नियोजन नसल्यामुळे अंतरसोवळ्याचे मात्र तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. या चाचण्या झाल्यानंतर अहवाल येण्यास किमान अर्धा तासांचा कालावधी लागतो. या काळात गर्दीचे नियोजन होत नसल्यामुळे अनेकदा होकारात्मक अहवाल आलेले रुग्णही तेथून पळ काढत असल्याने महापालिकेच्या पथकाची तारांबळ उडते.

शहरातील करोना प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासन मार्च महिन्यापासून विविध उपाययोजना करत आहे. याचा एक भाग म्हणून शहरात दाखल होणाऱ्या परप्रांतीय प्रवाशांची ठाणे रेल्वे स्थानकात महापालिका प्रशासनातर्फे शीघ्र प्रतिजन चाचणी केली जात आहे. अधिकाधिक चाचण्या वाढाव्यात आणि परराज्यातून येणाऱ्या करोनाबाधितांना वेळीच रोखले जावे हा यामागील उद्देश आहे. मात्र गर्दीचे नियोजन करताना होणारा गोंधळ आणि चाचण्यांसाठी अपुरे पडणारे मनुष्यबळ यांमुळे या उद्देशालाच हरताळ फासला जातो की काय असे चित्र आहे.

टाळेबंदी शिथिल झाल्यामुळे रेल्वे मार्गाने शहरात दाखल होणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून दररोज शेकडो परप्रांतीय ठाणे रेल्वे स्थानकात येत आहेत. त्यातुलनेत महापालिकेने स्थानक परिसरात गर्दी नियंत्रणासाठी कोणतेही नियोजन केलेले नाही. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात शीघ्र प्रतिजन चाचणीसाठी गेल्या चार दिवसांपासून स्थानकात लांबच्या लांब रांगा लागत आहेत. या रांगा लावण्यासाठी सुरक्षारक्षक नसल्यामुळे रांगेत अंतर नियमांचा फज्जा उडतो. अशा गर्दीच्या रांगेत शीघ्र प्रतिजन चाचणीसाठी परप्रांतीय एक ते दीड तास उभे राहतात.

चाचणी झाल्यावर अहवाल येण्यास अर्धा तासाचा कालावधी लागतो. या वेळेत प्रवाशांना बसण्यासाठी स्थानक परिसरात कोणतीही सोय करण्यात

आलेली नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबीयांसह आणि सामानासह प्रवासी जमिनीवरच घोळका करून बसतात. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील गर्दीत आणखी भर पडते. या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षारक्षक नसल्यामुळे अहवाल येण्यापूर्वीच चाचणीच्या ठिकाणाहून काही जण पळ काढतात. त्यामुळे चाचणीच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण तयार झाले असून या सावळ्या गोंधळामुळे शहरात करोना पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चाचण्या करण्यासाठी मर्यादित कर्मचारी

टाळेबंदी शिथिल झाल्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात दररोज शेकडो परप्रांतीय दाखल होत आहेत. मात्र, या परप्रांतीयांच्या चाचण्या करण्यासाठी महापालिकेने मर्यादित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून दिल्यामुळे या चाचण्यांची प्रक्रिया अधिक वेळखाऊ झाली आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अधिकचा भार येत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकातील शीघ्र प्रतिजन चाचण्या करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी वाढवण्याची मागणी केली जात आहे.

शीघ्र प्रतिजन चाचण्यांची प्रक्रिया अधिक सुटसुटीत होईल यासाठी नियोजन सुरू आहे. रेल्वे स्थानकांवर चाचण्या वाढविण्यात आल्याने शहरातील एकूण रुग्णांच्या आकड्यांमध्ये वाढ दिसत असली तरी ही प्रक्रिया अधिक वेगाने करण्याची आवश्यकता आहे.

– संदीप माळवी,  जनसंपर्क अधिकारी