ठाणे स्थानकातील पाचव्या पादचारी पुलाचे काम जोरात; जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात खुला होण्याची शक्यता

ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरील गर्दी कमी व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने कल्याणच्या दिशेला पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू केले आहे. रेल्वे स्थानकातील या पाचव्या पुलाचे लोकार्पण नव्या वर्षांच्या आरंभी करण्याचे जोरदार प्रयत्न प्रशासकीय वर्तुळात सुरू असून ठाणेकरांसाठी ही नववर्ष भेट ठरणार आहे. या पुलामुळे स्थानकातील गर्दीचे नियोजन करणे सोपे ठरेल, असा दावा प्रशासकीय सूत्रांनी केला.

मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांमध्ये ठाण्याचा समावेश होतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी विविध सुविधांची पेरणी मध्य रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे. रेल्वे स्थानक परिसरातील वाहनकोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी या ठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले आहे. तसेच येथील गर्दीला वाट मिळावी यासाठी पाचव्या पादचारी पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. सद्य:स्थितीत ठाणे रेल्वे स्थानकात एकूण चार पादचारी पूल आहेत. या रेल्वे स्थानकातून दिवसाला लाखो प्रवासी प्रवास करतात. तसेच चार पुलापैकी कल्याण आणि मुंबईच्या दिशेने असलेल्या पुलांची रुंदी फार कमी आहे. एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासनाने विविध रेल्वे स्थानकांतील अरुंद पुलांची पाहणी केली होती. ठाणे रेल्वे स्थानकात कल्याण आणि मुंबईच्या दिशेने असलेल्या या पादचारी पुलावर प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याचे स्पष्ट झाल्याने रेल्वेने नव्या पुलाच्या लोकार्पणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. रात्रीच्या वेळी ट्रान्स हार्बर आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या लोकल एकाच वेळी आल्या तर येथील काही पुलावरून चालणेही कठीण होत असते. कल्याणच्या दिशेकडील पुलावर अनेकदा भिकाऱ्यांचा वावर असल्याने चालताना त्याचा त्रासही प्रवाशांना सहन करावा लागत असतो. या अरुंद पुलाचा विचार करता गेल्या दीड वर्षांपासून या पुलाचे बांधकाम सुरू होते. अखेर या पुलाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. नववर्षांच्या पहिल्या आठवडय़ात हा पूल ठाणेकरांसाठी खुला केला जाणार आहे.

प्रवाशांना दिलासा

हा पूल बांधल्याने मोठय़ा प्रमाणात प्रवासी विखुरले जाऊन त्याचा फायदा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास होणार आहे. हा पूल फलाट क्रमांक दोन वर तसेच सॅटिस पुलालाही जोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. मुंबईच्या दिशेने नव्याने पूल बांधण्यात आला आहे. मात्र, हा पूल फलाट क्रमांक एकवर उतरत असल्याने त्याचा वापर फारच कमी होतो. कल्याणच्या दिशेने बनविण्यात येणारा हा पूल कोपरी येथील सॅटिसला जोडला असल्याने पूर्वेतील प्रवाशांनाही स्थानकात ये-जा करणे सोयीचे ठरणार आहे.