ठाणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांकडून बेकायदा वसुली

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात वाहनांच्या पार्किंगसंदर्भात कोणतेही धोरण रेल्वे प्रशासनाकडून राबवण्यात येत नसल्यामुळे त्याचा फटका स्थानक परिसरात वाहने घेऊन येणाऱ्या हजारो प्रवाशांना बसू लागला आहे. येथील ठेकेदारांचा पार्किंग शुल्क वसुलीचा ठेका संपला असून रेल्वेने अद्याप या ठेक्याचे नूतनीकरण केलेले नाही. असे असताना या भागात बिनदिक्कतपणे बेकायदा शुल्कवसुली सुरू झाली असून अशी वसुली करणाऱ्या काही टोळ्याच या भागात सक्रिय झाल्या आहेत.

दररोज प्रवाशांकडून वसूल होणारा पैसा या टोळक्यांच्या हाती जात असून रेल्वे प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शासकीय महसूलही बुडत असल्याचे चित्र आहे. रेल्वे प्रशासनाने या भागात पार्किंग शिस्त लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली नसल्यामुळे याचा फायदा घेत बेकायदा टोळक्यांची चंगळ सुरू आहे. रेल्वेने दिलेल्या जुन्या ठेक्याप्रमाणे या भागात अधिकृतपणे ३० रुपयांचे शुल्क वसूल केले जात असे. हा ठेका संपल्याने आता अनधिकृतपणे २० ते २५ रुपयांची वसुली सुरू असल्याचे चित्र आहे.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील पूर्व आणि पश्चिम भागात रेल्वे प्रशासनाची मोकळी जागा असून या जागांचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून वाहनतळासाठी केला जात आहे. या भागात वाहने उभी करणाऱ्यांकडून शुल्कवसुली करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठेकेदारांची नियुक्ती केली होती. त्यानुसार या वाहनतळाचे व्यवस्थापन ठेकेदाराकडून सुरू होते. दुचाकी वाहनांसाठी दिवसाचे ३० रुपये या   ठेकेदाराकडून आकारले जात असत. महिन्याच्या पाससाठी पाचशे रुपयांचे शुल्क आकारले जात असे. मध्यंतरी हा ठेका संपल्यामुळे ही शुल्कवसुली बंद झाली होती. या काळात नागरिकांकडून परिसरात पार्किंग करताना अनेक अडथळे निर्माण होऊ लागले होते.

या परिस्थितीचा फायदा उचलत काही टोळक्यांनी या ठिकाणी वावर सुरू केला असून मनमानीपणे शुल्क वसूल करण्यास सुरुवात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे.

काही प्रवाशांच्या म्हणण्यानुसार ही मंडळी पूर्वीच्या ठेकेदाराकडे काम करणारे कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या बेकायदा वसुलीमुळे रेल्वेचा महसूल बुडत असून नागरिकांनाही विनाकारण पार्किंगचा भरुदड सहन करावा लागत आहे.

कोटय़वधीच्या महसुलालाही फटका

ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये सुमारे एक लाखाहून अधिक दुचाकी वाहने उभी राहत असून त्यांच्याकडून प्रत्येक दिवशी ३० रुपयांचे शुल्क वसूल केले जाते. हे शुल्क चार दिवसांत कोटीचा आकडा ओलांडत असून महिन्याभरामध्ये हा निधी आठ कोटींहून अधिक होतो. त्यामुळे इतका मोठा महसूल खासगी व्यक्तींकडून वसूल करून लूट केली जात आहे. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार वाढत असल्याचा आरोप प्रवासी करीत आहेत.

स्थानक परिसरात पार्किंग मोफत..

ठाणे रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये पार्किंग शुल्क वसूल करण्यासाठी कोणत्याही ठेकेदाराची नेमणूक केलेली नसून कोणत्याही प्रकारचे पार्किंग शुल्क रेल्वे प्रशासनाकडून वसूल केले जात नाही. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे शुल्क नागरिकांनी गाडय़ा पार्क करण्यासाठी देऊ नये.

एस. बी. महिधर, व्यवस्थापक, ठाणे रेल्वे स्थानक

 

पार्किंगचे ठेके सुरळीत करावेत..

मोफत पार्किंग दिल्यास बेशिस्तपणा व खासगी वाहनांचा वापर वाढीस लागतो. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्यासाठी पार्किंगसाठी शुल्क असणे गरजेचे आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या महसुलामध्ये भर पडेल. रेल्वे प्रशासनाच्या कुचकामीपणामुळे हा सगळा पैसा खासगी लोकांच्या खिशात जात असून ही प्रवाशांची लूट आहे.

प्रसाद चिटणीस, ठाणे