25 November 2017

News Flash

स्थानक परिसर कोंडीमुक्तीकडे

या वाहनांच्या तुलनेत पुलाशेजारील रस्ता अपुरा पडू लागला आहे.

खास प्रतिनिधी, ठाणे | Updated: July 15, 2017 2:26 AM

ठाण्यातील ‘सॅटिस’जवळील रस्त्याचे रुंदीकरण

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचे चक्रव्यूह भेदण्यासाठी ठिकठिकाणी रस्ते रुंदीकरणाची मोहीम राबवणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाने आता ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसर कोंडीमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. शिवाजी पथवरील सॅटिस पुलाच्या पायथ्याजवळ अरुंद असलेल्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. हा रस्ता रुंद झाल्यानंतर ठाणे स्थानक ते जांभळी नाक्यापर्यंतच्या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची सुटका होणार आहे.

ठाणे पश्चिम स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी याठिकाणी सॅटिस पुलाची उभारणी काही वर्षांपूर्वी करण्यात आली. सॅटिस पुलाची एक मार्गिका शिवाजी पथ मार्गावरही उभारण्यात आली. ही मार्गिका तलावपाळीजवळ उतरविण्यात आली आहे. या मार्गिकेच्या पायथ्याशेजारीच सुमारे पाच मीटर रुंदीचा रस्ता आहे. हा रस्ता ठाणे स्थानकाला जोडण्यात आला असल्यामुळे येथून सतत वाहनांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. या वाहनांच्या तुलनेत पुलाशेजारील रस्ता अपुरा पडू लागला आहे. याशिवाय या मार्गालगत भाजीमंडई असल्यामुळे तिथे मालवाहू वाहनेही येतात. ही वाहने रस्त्याच्याकडेला उभी केली जातात. त्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. या कामासाठी पाच कोटी ३३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

रुंदीकरण असे होणार..

  • शिवाजी पथ मार्गावरील सॅटिस पुलाशेजारी सुमारे पाच मीटर रुंदीचा रस्ता आहे. या रस्त्याशेजारी ४.५० मीटर रुंदीचा पदपथ आहे. या पदपथाचा काही भाग तोडून त्याठिकाणी रस्ता रुंद करण्यात येणार आहे.
  • अमरामरजी चौक ते जांभळी नाक्यापर्यंत तीन मीटर इतका रस्ता रुंद करण्यात येणार आहे.
  • तलावच्या बाजूला तरंगता पदपथ तयार करण्यात येईल.

तरंगता पदपथ

मासुंदा तलावाच्या काठाजवळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तरंगता पदपथ तयार करण्यात येणार आहे. यासाठी तलावामध्ये कोणतेही बांधकाम करण्यात येणार नसल्याचे प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या पदपथाचा पृष्ठभाग काचेचा असणार आहे. स्मार्ट सिटी योजनेंतून हे काम करण्यात येणार आहे. मात्र या योजनेतून निधी मंजूर झाला नाही तर पालिकेच्या खर्चातून हे काम करण्यात येणार आहे.

First Published on July 15, 2017 2:24 am

Web Title: thane station traffic issue