नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांप्रमाणे व्यावसायिक संकुलाची उभारणी करण्याचा मार्ग मोकळा

वाट अडवून बसलेले फेरीवाले, अरुंद पादचारी पूल, वाहनतळांची मर्यादित संख्या या कारणांमुळे प्रवाशांसाठी समस्यांचे आगार बनलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाचा येत्या काळात कायापालट होण्याची चिन्हे आहेत. देशभरातील ए-१ आणि ए-२ श्रेणीतील रेल्वे स्थानकांचा परिसर खासगी विकासकांना ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देऊन त्यांचा पुनर्विकास करण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. त्यामुळे ठाणे रेल्वेस्थानकाचाही पुनर्विकास करून त्या ठिकाणी वाशी, बेलापूर या नवी मुंबईतील स्थानकांप्रमाणे व्यावसायिक संकुलाची उभारणी करणे शक्य होणार आहे. ठाणे महापालिकेनेही या स्थानकाच्या पुनर्विकासासाठी आवश्यक असलेला वाढीव चटईक्षेत्राचा प्रस्ताव यापूर्वीच मंजूर करून राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविला आहे.

illegal construction in green zone near Kopar railway station in Dombivli
डोंबिवलीत कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…
Passengers are monitored through cameras based on AI technology in Pune railway station
सावधान! रेल्वे प्रवाशांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची नजर; संशयास्पद हालचाली टिपल्या जाताहेत

केंद्रीय मंत्रिमंडळाने जून, २०१५ मध्ये देशभरातील ए-१ आणि ए श्रेणीतील स्थानकांचा खासगी विकासकांमार्फत पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ४५ वर्षांच्या भाडेतत्वावर स्थानके देण्याचे निश्चित केले. त्यासाठी निविदाही काढण्यात आल्या. त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. पश्चिम रेल्वेवरील वांद्रे, मुंबई सेन्ट्रल, बोरिवली आणि मध्य रेल्वेवरील ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनसचा या पुनर्विकासात समावेश करण्यात आला होता. मात्र या स्थानकांच्या पुनर्विकासासाठी वारंवार निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत पुनर्विकासाचे काम रखडले होते. निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर रेल्वेने विकासक, गुंतवणूकदार यासह रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांची मते जाणून घेतली. या वेळी भाडेकरार ४५ ऐवजी ९९ वर्षांचा करावा अशी सूचना पुढे आली. अखेर भाडेतत्त्वावर देण्यात येणाऱ्या करारात बदल करण्याचा निर्णय घेतला गेला. केंद्रीय मंत्रिमंडळानेही ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्थानकाची जागा देण्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे मध्य व पश्चिम रेल्वेवरील पाच स्थानकांच्याही पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील भांडुप, नाहूर आणि ठाणे या तीन स्थानकांवर व्यावसायिक संकुले उभारण्यासाठी वाढीव चटईक्षेत्र मंजूर करण्याचा प्रस्ताव रेल्वे विकास कॉर्पोरेशनने मुंबई आणि ठाणे महापालिकेपुढे यापूर्वीच ठेवला आहे. मात्र वाढीव चटईक्षेत्राचे अधिकार बहाल करण्याऐवजी व्यावसायिक संकुल उभारणीचे हक्क विकत घेण्याची तयारी ठाणे महापालिकेने दाखविली आहे. त्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात २८ कोटी रुपये रोख, तर दरवर्षी सुमारे तीन कोटी रुपयांचा प्रीमियम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला भरण्याचा प्रस्ताव अभियांत्रिकी विभागाने तयार करून रेल्वे प्रशासनाला पाठविला आहे.

ठाणे रेल्वे स्थानकाच्या आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या लक्षात घेता स्थानकाच्या डोक्यावर व्यावसायिक संकुलाची उभारणी कितपत फायदेशीर ठरेल याचा अभ्यासही सुरू करण्यात आला आहे.

त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या जागेवर व्यावसायिक संकुल उभारायचे आणि त्याचा वापर नागरी सुविधा केंद्र, वाहनतळ, फूड कोर्टच्या निर्मितीसाठी करायचा असा प्रस्ताव ठाणे महापालिकेने यापूर्वीच रेल्वे कॉर्पोरेशनला दिला आहे. त्यामुळे महापालिकेचा प्रस्ताव मंजूर होतो किंवा रेल्वे स्वत खासगी विकासकाच्या माध्यमातून पुनर्विकासाचे काम हाती घेते या विषयी निर्णय होणे बाकी आहे, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासाला परवानगी देण्यात आली असून, तेथे वाशी रेल्वे स्थानकासारखे व्यावसायिक संकुल उभे राहण्याची शक्यता आहे.