किशोर कोकणे

ठाणे रेल्वे स्थानकातील पश्चिमेकडील बाजूस उभारण्यात आलेल्या वाहनतळाचा पहिला मजला प्रवाशांच्या वाहनांना खुला करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. ठेकेदाराची नियुक्ती झाली नसल्याने ६०० हून अधिक दुचाकी उभ्या करण्याची क्षमता असलेला हा वाहनतळ अद्याप खुला करण्यात आलेला नाही. रेल्वे प्रशासनाने उशिरा का होईना ठेकेदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. तीन महिन्यांसाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या ठेकेदाराने किमान २५ लाख रुपये रेल्वेला भाडय़ापोटी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या निविदेस ठेकेदारांचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

ठाणे रेल्वे स्थानकात दिवसाला सुमारे सहा लाख प्रवासी ये-जा करत असतात. यातील हजारो प्रवासी खासगी वाहनाने ठाणे रेल्वे स्थानक गाठत असतात.

या प्रवाशांना ठाणे रेल्वे स्थानकाजवळ वाहने उभी करता यावीत यासाठी येथील वाहनतळाला मंजुरी मिळाल्यानंतर २०१५ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, चार वर्षे उलटूनही हा प्रकल्प पूर्ण झाला नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. काही महिन्यांपूर्वी वाहनतळाची उर्वरित कामेही सुरू करण्यात आली. तर पहिल्या मजल्याचे काम पूर्ण करण्यात आले.

प्रवाशांची कोंडी होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर पहिला मजला वाहनांसाठी खुला करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मजल्यावर सुमारे सहाशे दुचाकी उभ्या राहू शकतात. ठाणे रेल्वे स्थानकातील या पार्किंग प्लाझाचे काम

पूर्ण झाले नसल्याने ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गोखले रोडवर मोठय़ा प्रमाणात पार्किंग होते. त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून वाहनांच्या प्रतीक्षेत असलेला हा मजला लवकरच खुला करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी ठेकेदार नियुक्तीसाठी आवश्यक प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली. या वाहनतळाचा ठेका मिळविण्यासाठी ठेकेदाराने वर्षांला किमान एक कोटी रुपयांचे भाडे देणे अभिप्रेत आहे. ही रक्कम अधिक असल्याची चर्चा असल्याने निविदेस ठेकेदारांचा कसा प्रतिसाद लाभतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

प्रकल्प काय?

२०१५ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली होती. एकूण १७ कोटी या प्रकल्पासाठी खर्च होणार होता. मात्र या प्रकल्पाला मिळालेला निधी मध्य रेल्वेने ठाणे स्थानकातील सरकते जिने, नवे पूल, लिफ्ट यासाठी खर्च केला होता. त्यामुळे निधीअभावी हा प्रकल्प बंद पडला होता. त्यानंतर पुन्हा या प्रकल्पाला निधी प्राप्त झाल्याने काही महिन्यांपासून वाहनतळाच्या कामाला सुरुवात केली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास दोन हजार दुचाकी येथे उभ्या राहू शकतात.