बदलापुरातील ‘सनराईज इंटरनॅशनल’ शाळेच्या १९ विद्यार्थ्यांनी तब्बल २६ तास दूध बिस्कीट खात सलग स्केटिंग करीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्येही करण्यात आली आहे. विशेष बाब गिनीज बुकात नोंद झालेला या विद्यार्थ्यांचा सलग दुसरा विक्रम आहे.

बदलापूर येथील पहिली ते सहावी इयत्तेत शिकणारे १९ विद्यार्थी कर्नाटकातील बेळगाव येथे एका स्पर्धेसाठी गेले होते. तेथे बिस्कीट डंकिंग रिले या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बिस्कीट ‘डंकिंग रिले’ म्हणजे दूध, बिस्कीट खात स्केटिंग रिले करणे. देशभरातून येथे ३९५ विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले होते. या स्पर्धेत २६ तास  विद्यार्थी दूध बिस्कीट खात स्केटिंग करत होते. या २६ तासांत विद्यार्थ्यांनी तब्बल ५०० लिटर दूध पीत १० हजार बिस्किटे फस्त केली. २६ तासांच्या या अथक परिश्रमानंतर विद्यार्थ्यांनी नव्या विक्रम नोंदवला. यापूर्वी अमेरिकेच्या २५५ विद्यार्थ्यांनी १२ तास स्केटिंग करत विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र बेळगाव येथे झालेल्या या स्पर्धेत हा विक्रम मोडीत निघाला आणि २६ तासांचा नवा विक्रम प्रस्थापित झाला. या विक्रमात बदलापूरच्या १९ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यामुळे ही बाब आमच्यासाठी अभिमानाची असून बदलापूरच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेल्याची भावना शाळेच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केली आहे.

या विक्रमात सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्केटिंगची आवड असल्याने त्यांना  शाळेतूनही  प्रोत्साहन मिळाले. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशिक्षण घेत असलेल्या या मुलांनी स्केटिंगमधील निपुणता जोपासून अव्वल आणि अनेक तास सतत स्केटिंग करण्याचे कौशल्य आत्मसात केले. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी अनेक जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धेत सहभाग घेत चमकदार कामगिरी केली आहे. या विद्यार्थ्यांच्या नावे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, चिल्ड्रन रेकॉर्ड, ग्लोबल रेकॉर्ड, इंडियन बुक अचिव्हर्स ऑफ रेकॉर्ड, इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड  असे अनेक विक्रम जमा आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षीसुद्धा या शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी ‘चेन ऑफ रोलर स्केटिंग’ स्पर्धेत जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. त्यामुळे या जागतिक विक्रमामुळे त्यांची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली होती.