पोलिसांत तक्रार दाखल

ठाणे : महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयामध्ये रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी रुग्णाच्या मुलीने कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतात. तरीही या रुग्णालयात एका रुग्णाकडून दीड लाख रुपये घेतल्याचे प्रकरण दीड महिन्यांपूर्वी उघडकीस आले होते. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करून ग्लोबल रुग्णालयातील एका डॉक्टरला अटक केली होती. आता असेच आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. दादरमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या वडिलांना एप्रिल महिन्यात करोनाची लागण झाली होती. मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी रुग्णशय्या मिळत नसल्याने त्यांना ठाण्याच्या ग्लोबल रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र दाखल करून घेण्यासाठी त्यांच्याकडून एक लाख रुपये घेतले. त्यांनी दहा हजार रुपये ऑनलाइनद्वारे तर उर्वरित ९० हजार रुपये रुग्णालयाबाहेरील परिसरात एका डॉक्टरला दिले होते.