मध्यवर्ती ठाण्यातील दुरावलेली मतपेढी पुन्हा कमवण्याचा प्रयत्न

गुजराती, मारवाडी व्यापाऱ्यांचा भरणा असलेल्या ठाण्यातील गोखले रोड, कोपरी, नौपाडा परिसरातील दुकानांसमोर महापालिकेने कचराफेक सुरू करताच या मुद्दय़ावरून शिवसेनेनेही गुरुवारी आक्रमक भूमिका घेतली. विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत या भागातील व्यापारी वर्गाची मते भाजपकडे वळल्याचा मोठा फटका सेनेला बसला होता. या पाश्र्वभूमीवर नौपाडा, पाचपाखाडी परिसरातील पराभवानंतर शिवसेनेने आता क्षतिनियंत्रण सुरू केले आहे. त्यामुळेच गुरुवारी व्यापाऱ्यांसोबत शिवसेनेचे नेतेही ‘कचराफेक’च्या मुद्दय़ावर आक्रमक झाल्याचे दिसून आले.

ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली असली तरी ठाणे विधानसभा क्षेत्रात भाजपने मुसंडी मारल्याने पुढील विधानसभा निवडणूकही शिवसेनेसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. नौपाडा, पाचपाखाडी या सेनेच्या बालेकिल्ल्यांमध्ये विलास सामंत, हिराकांत फर्डे, भास्कर पाटील आणि राजन विचारे या बडय़ा नेत्यांचा नेहमीच दबदबा राहिला आहे. परंतु, पालिका निवडणुकीत भाजपने नौपाडय़ात एकतर्फी विजय मिळवतानाच पाचपाखाडी आणि टेंभी नाका भागातही सेनेला जोरदार लढत दिली. या पाश्र्वभूमीवर आपली जुनी मतपेढी पुन्हा कमवण्यासाठी शिवसेनेचे नेते कामाला लागले आहेत. ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातील मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी पक्षाच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळेच गुरुवारी व्यापाऱ्यांच्या आंदोलनात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.

नौपाडय़ातील व्यापाऱ्यांच्या दुकानाबाहेर कचराफेक होताच शिवसेनेचे महापौर, सभागृह नेते व्यापाऱ्यांच्या भेटीसाठी गोखले रोड येथे आले.

दोन्ही पक्षांत चढाओढ

भाजपचे स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, मृणाल पेंडसे हेदेखील आक्रमकपणे व्यापाऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरले होते. यावेळी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी पुढाकार घेत पालकमंत्री एकनाथ िशदे यांची व्यापाऱ्यांसोबत चर्चा घडवून आणली. त्यानंतर िशदे यांनीही आक्रमक भूमिका घेत महापालिका अधिकाऱ्यांना आक्रमक भाषेत फैलावर घेतले. व्यापारी आणि हॉटेल मालकांना आकारण्यात आलेला कचरा कर रद्द केला जाईल, अशी घोषणा यावेळी महापौर मीनाक्षी िशदे यांनी करत व्यापाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला.